पित्ताचा त्रास होतोय, ही काळजी घेतल्यास पित्त विकार टाळला जाऊ शकतो! जाणून घ्या अधिक | पुढारी

पित्ताचा त्रास होतोय, ही काळजी घेतल्यास पित्त विकार टाळला जाऊ शकतो! जाणून घ्या अधिक

डॉ. आनंद ओक

आयुर्वेदाने मानलेल्या शरीरातील तीन कार्यकारी पदार्थांपैकी पित्त हा एक पदार्थ होय. वात व कफ याप्रमाणेच प्रत्येक मनुष्याच्या शरीरामध्ये असणारा एक द्रव स्वरूपी, स्नेहयुक्त, लघुगुणांचा, उग्र गंधाचा आणि अत्यंत उष्ण आणि तीक्ष्ण गुणांचा हा पदार्थ असतो.
पित्त शरीरामध्ये निसर्गातून घेतललेल्या पदार्थांचे रूपांतर करून त्यातून शरीरभाव पदार्थ उत्पन्न करणे तसेच शरीरांतर्गतदेखील एका पदार्थाचे दुसर्‍या पदार्थांत परिवर्तनाचे म्हणजेच पचन करण्याचे कार्य करीत असते. असेही पित्त प्रत्यक्ष शरीरात अन्न पदार्थांचे पचन करणे, तहान उत्पन्न करणे, अन्नामध्ये आकर्षण उत्पन्न करणे, शरीराला विविध वर्ण प्राप्त करून देणे, याचबरोबर बुद्धीचे कार्य चालविणे, शौर्य व धैर्य टिकविणे, नेत्रेंद्रियाला रूप ग्रहण करून देण्याची शक्ती देणे, तसेच आहाररसातून रक्ताची उत्पत्ती करण्याचे महत्त्वाचे कार्यदेखील करीत असते.

पित्त प्रकोपक आहार – यापासून सावध राहा

तिखट, मसालेदार, अतिआंबट किंवा अतिखारट याच चवीचे थोडक्यात चमचमीत स्वभावाने उष्ण, दाह निर्माण करणारे उदा. शेंगदाणे व त्याचे पदार्थ, तळून केलेले मसालेदार, फ्राय पदार्थ, हिरवी मिरची, खरडा, रेंझका, लोणची या स्वरूपातील तोंडी लावणे, आम्ल रसात्मक किंवा आंबवून केलेले पदार्थ म्हणजेच दही, ताक, बियर, डोसा, इडली, ढोकळा, जिलेबी, ब्रेड, चिंच, आंबट फळे तसेच मिरी, लवंग, दालचिनी, ओवा, आले, लसूण यांचे अतिप्रमाणात सेवन, कोल्हापुरी म्हटला जाणारा कट, रस्सा यांचे अतिप्रमाणात नियमित सेवन, चहा, कॉफी, तंबाखू, सिगारेट, मावा, गुटखा या उत्तेजकांचे सतत सेवन. याचबरोबर मासे, अंडी, मटण, चिकन, नियमित खाणे आणि जंतू संसर्ग झालेल्या अशुद्ध पाण्याच्या सेवनाने पित्त प्रकोपित होते.

मानसिक तणाव महत्त्वाचे कारण

काही वेळ वरील प्रकारचे अन्न पदार्थ टाळणार्‍या माणसांतही पित्त प्रकोप आढळतो. अशा वेळी अतिचिंता, अतिक्रोध, अतिभय, जास्त जबाबदारी, तणाव इत्यादी मानसिक कारणे आढळतात, तर सतत उष्णतेजवळ काम, उन्हात काम, रात्री सतत जागरण आणि स्त्रियांच्या बाबतीत विशेषत्वाने दिसणारे वारंवार केले जाणारे उपवास इत्यादी विहारातील कारणांनीदेखील पित्त प्रकोप होताना आढळतो.
वरील कारणे वयाच्या 15 ते 35 या काळात घडली, तर असा पित्त प्रकोप जास्त प्रमाणात आढळून येतो. काळ प्रभावाप्रमाणे तीव्र उन्हाळा आणि शरद ऋतू, ऑक्टोबर हिट या काळात स्वभावतःच पित्त प्रकोप होण्याची शरीरप्रवृत्ती असते.

प्रकोपित पित्ताची लक्षणे

प्राथमिक स्वरूपाच्या पित्त प्रकोपामध्ये तोंड कडू होणे, तोंडाला दुर्गंधी येणे, घशाशी आंबट येणे, पोटात, छातीत व घशात जळजळणे, संडास व लघवीची आग होणे, जळजळीत व कडू उलटी होणे ही लक्षणे दिसतात. अशी लक्षणे दिसत असताना पित्त प्रकोपक कारणे तशीच चालू राहिली, तर यानंतर विविध ठिकाणांचा दाह होऊ लागतो तसेच वाफा आल्याप्रमाणे वाटणे, जास्त ठिकाणची साले जाणे, भेगा पडणे, अंगावर तांबड्या गांधी उठणे, तांबडे पट्टे उठणे, त्वचा वर्ण पिवळा होणे, वारंवार घसा, मलम उत्तेंद्रिय, तोंड सुजणे, डोळ्यांची आग होणे व नंतर थुंकीवाटे, उलटीवाटे, संडास किंवा लघवीवाटे रक्त पडणे ही लक्षणे निर्माण होतात. या बरोबरच मज्जा धातूवर परिणाम झाल्यास अंगकड गळून जाणे, अंधारी येणे, मुर्छा येणे यासारखी लक्षणे पाहायला मिळतात. यकृत या अवयवाच्या विकृतीमुळे कावीळ हीदेखील पित्त प्रकोपाचेच लक्षण आहे.

याप्रमाणे लाक्षणिक स्वरूपात पित्त प्रकोप व्यक्त होत असला, तरी व्याधी म्हणून मात्र आम्लपित्त किंवा हायपर अ‍ॅसिडिटी अल्सर हा विकारच जास्त त्रासदायक ठरणारा आणि सार्वत्रिक आढळणारा दिसून येतो. आम्लपित्तवर वर्णन केेलेली एक किंवा अधिक पित्त प्रकोपक कारणे सतत घडत राहिल्याने पोटातील पाचक पित्त, विकृत होऊन आम्लपित्त हा विकार होतो. याच्या पूर्व लक्षणात आंबट ढेकर येणे, छातीत, पोटात, घशाशी जळजळणे व तोंड कडू होणे ही लक्षणे दिसतात व काही काळानंतर मळमळणे, जळजळ वाढणे, उमासे येणे, सतत डोके दुखणे, तोंडाला पाणी सुटणे, अन्नाचे पचन न होणे व श्रम केलेवाचून थकवा वाटणे अशी लक्षणे आढळतात. यातील उर्ध्वंग आम्लपित्त या प्रकारात हिरवे, पिवळे दुर्गंधीत, अतिचिकट, कडू, खारट व तिखट अशा स्वरूपाचे पित्त उलटीवाटे बाहेर पडते. छाती, घसा, पोट या ठिकाणी आग होते, हात-पाय गरम होऊन ताप येतो. पोटात दुखते व उलटीनंतर आराम पडतो अशी लक्षणे दिसतात, तर आधोग आम्लपित्त या प्रकारात वारंवार हिरवे, पिवळे, लाल, दुर्गंधीयुक्त पातळ संडासला होणे, चक्कर येणे, अंगाची आग होणे, गांधी उठणे इत्यादी लक्षणे काहीजणांत दिसतात.

अल्सर आणि कोलायटिस

वरील प्रकारे आम्लपित्ताचा त्रास होणार्‍या लोकांनी पथ्य न सांभाळता पित्त प्रकोप आहार, विहार, तसाच चालू ठेवल्यास कालांतराने जेवनानंतर पोटात दुखणे, उलट्या होणे व उलटीवाटे रक्त पडणे ही लक्षणे दिसू लागतात. ज्याला आधुनिक शास्त्राप्रमाणे अल्सर म्हटले जाते, तर काही वेळा अशा व्यक्तींना अनियमित भूक लागणे, पोट फुगणे, पोट जड वाटणे, तोंडाला पाणी सुटणे, पोट गुडगुडणे, पोट दुखणे, कळ करून वारंवार दाहयुक्त पातळ शेमयुक्त, दुर्गंधीयुक्त संडास होणे आणि या सर्वांतही संडास साफ झाल्याची संवेदना नसणे या लक्षणांनी युक्त कोलायटि हा विकार होतो.

याचे स्वरूप अत्यंत जीर्ण असून त्याच्या दुष्परिणामी जसा काळ जाईल, तशी रोग प्रतिकार शक्ती कमी होत जाणे व वजन कमी होणे, तसेच तीव्र थकवा, निरुत्साह, पांडुरोग, अ‍ॅनिमिया हे उपद्रव आढळतात.

रामबाण पंचकर्म

अतिप्रमाणात वारंवार पित्त वाढत असल्यास ते जुलाबावाटे काढून टाकणे असा विरेचन उपचार केला जातो. यासाठी साधारणपणे 5 ते 7 दिवस रोज शरीराला मसाज व वाफारा दिल्यानंतर औषधांच्या सहाय्याने जुलाब घडविले जातात. ज्यामुळे कोणताही अशक्तपणा न येता शरीरातील अशुद्ध पित्त काढून टाकले जाते. औषधी उपचार घेऊनदेखील उपयोग होत नसणार्‍यांसाठी तसेच पित्ताच्या परिणामी उष्णता, त्वचा विकार, झोपेच्या तक्रारी इ. चा त्रास असणार्‍यांना हा विरेचन उपचार रामबाण उपयोगी पडतो. मानसिक तणाव जास्त असल्यास शिरोधारा हा उपक्रम केला जातो.

औषधी चिकित्सा

वनस्पतीच्या औषधींमध्ये सुंठ, ज्येष्ठमध, आवळा, चंदन, उशिर, नागरमोथा, पित्तपापडा, निशोत्तर, कुटकी, निंब, भुनिंब, गुठवेल, हिरडा आडूळसा इत्यादी द्रव्यांचा तर गेरीक, शंखा भस्म, प्रवाळ भस्म, गुळवेद सत्त्व अभ्रक भस्म, अकिक पिष्टी, मौक्तिक भस्म यासारख्या भस्मांचा आणि यापासूनच बनलेल्या विविध आयुर्वेदीय औषधीकल्पांचा पित्त विकारांचा हमखास उपयोग होतो. अर्थात, प्रत्येक रुग्णाच्या प्रकृती, वय, कोठा इत्यादी परीक्षणानंतरच वरील द्रव्ये जास्त उपयोगी होतात. म्हणूनच तज्ज्ञ आयुर्वेदीय वैद्याचे सल्ल्यानंतरच ती घेणे फायदेशीर ठरते.

प्रतिबंधक उपाय

आहार-विहारातील विकृतीमुळेच पित्त प्रकोप होत असल्याने या आधी पित्त प्रकोपक म्हणून सांगितलेले पदार्थ कमी प्रमाणात खाणे आणि ज्याला पित्ताचा त्रास सुरू झाला आहे, अशाने कटाक्षाने त्यांचे सेवन टाळणे, तसेच दूध, ताजे ताक, गायीचे तूप, थंड पाणी, डाळींब, द्राक्ष, खजूर, लिंबू सरबत, कोकम सरबत, नारळाच्या किंवा कोहाळ्याच्या वड्या, मोरावळा, गुलकुंद हे पदार्थ नित्य सेवनामध्ये ठेवणे. यामुळे पित्त विकारांचा प्रतिबंध होतो. पित्त प्रकोपाच्या काळात या गोष्टींचे जास्त कटाक्षाने पालन करणे फायदेशीर ठरते. विहारातील वर्णन केलेली जागरण, उन्हाचा संपर्क, अति मद्यपान, अतिचिंता इत्यादी गोष्टी टाळून, नियमित वेळी झोपे घेणे, थंड पाण्याने सतत डोक्यावर, उन्हात टोपी वापरणे, उष्णतेपाशी काम करताना सतत त्या एका जागी न थांबणे यासारख्या काळज्या घेतल्यास हे पित्त विकार टाळले जाऊ शकतात.

थोडक्यात, पित्त हा आपल्या शरीर व्यापार्‍यांना अत्यंत उपयुक्त आवश्यक असणारा पदार्थ प्रत्येकाच्या शरीरात असतोच. तो विकृत झाल्यासच आम्लपित्त इत्यादी विकार उत्पन्न होतात व असे विकार उत्पन्न झाल्यास आयुर्वेदीय चिकित्सेनेच त्यापासून पूर्णतः मुक्ती मिळते. म्हणून प्रत्येकाने आपल्या शरीरातील पित्तस्वरूपी शक्तीचे आयुर्वेदीय पद्धतीने पथ्य पाळून रक्षण करावे.

Back to top button