पुढारी ऑनलाईन डेस्क : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी देशातील महिलांना जास्तीत जास्त आठ मुले जन्माला घालण्याचे आणि मोठ्या कुटुंबांना "आदर्श" बनवण्याचे आवाहन केले आहे. पुतिन यांनी मॉस्कोमध्ये जागतिक रशियन पीपल्स कौन्सिलला संबोधित करताना हे सांगितले.
१९९० पासून रशियाचा जन्मदर घसरत आहे आणि गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून देशातील ३ लाखाहून अधिक बळी गेले आहेत, असे द इंडिपेंडंटने एका अहवालात म्हटले आहे. येत्या काही दशकात रशियाची लोकसंख्या वाढवणे हे आमचे ध्येय असेल, असे पुतीन यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की, आपल्याकडे आजही मोठ्या घराण्यांवर विश्वास ठेवणारे अनेक समाज आहेत. त्यांना चार, पाच किंवा अधिक मुले आहेत. आपल्या आजी, पणजींना ७-८ किंवा त्याहून अधिक मुले असायची. रशियाने मोठ्या कुटुंबांना जीवनपद्धती म्हणून स्वीकारून अशा परंपरा जिवंत ठेवण्याची गरज आहे. कुटुंब हा केवळ राज्याचा किंवा समाजाचा आधार नसून धार्मिक दृष्टिकोनातूनही योग्य आहे. सर्व धर्मांनी कुटुंबे मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि हे युगानुयुगे रशियाचे भविष्य असावे, असेही पुतिन यांनी म्हटले आहे.
युक्रेनसोबतच्या युद्धाला २० महिन्यांहून अधिक काळ लोटला असताना पुतिन यांनी हे वक्तव्य केले आहे. या युद्धात लाखो रशियन सैनिक मारले गेले आहेत. नोव्हेंबरमध्ये ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाने दावा केला होता की, युक्रेनसोबतच्या युद्धात तीन लाखांहून अधिक रशियन सैनिकांचा मृत्यू झाला होता. त्याचवेळी, रशियाची सरकारी वृत्तसंस्था TASS ने १ जानेवारी २०२३ रोजी देशाची लोकसंख्या १४.६४ कोटी होती असे सांगितले होते.
हेही वाचा :