Happy Friendship Day 2023 : जाती-धर्माच्या भेदून भिंती, १४३ वर्षांची मैत्री!

Happy Friendship Day 2023 : जाती-धर्माच्या भेदून भिंती, १४३ वर्षांची मैत्री!
Published on
Updated on

बेळगाव; ज्ञानेश्वर पाटील : 'यह दोस्ती, हम नही तोडेंगे, तोडेंगे दम मगर, तेरा साथ ना छोडेंगे..'या गीताने मैत्रीची व्याख्या चपखल केली आहे. स्वतःची जराशीही पर्वा न करता कसल्याही प्रकारची मदत करण्यास आपण तयार असतो, असे नाते म्हणजे मैत्री. मैत्री सहजासहजी होत नाही आणि सहजासहजी तुटतही नाही. अशाच अतूट मैत्रीचे एक उदाहरण म्हणजे आगा-आजगावकर ही आंतरधर्मीय मित्रांची जोडी. आधी मैत्री, मग व्यवसायात भागीदारी आणि ती भागीदारी आता चौथ्या पिढीतही कायम, असा हा हिंदू-मुस्लिम मैत्रीचा आणि व्यावसायिक भागीदारीचा 143 वर्षांचा इतिहास आजही बेळगावात जपला जात आहे. मोदीनसाहेब आगा आणि सखाराम आजगावकर अशी त्या मित्रांची नावे. त्यांची चौथी पिढीही आजही मैत्री आणि त्यातून उभारला गेलेला भागीदारीतील व्यवसाय पुढे चालवत आहे.

आजगावकर यांचे पूर्वज सावंतवाडीतील तर आगा यांचे पूर्वज चंदगड भागातील होते. मोदीनसाहेब आगा आणि सखाराम आजगावकर हे दोघे मेणसे गल्लीतील माने यांच्या दुकानात कामाला होते. माने हे सूत, कापड तयार करण्यासाठी लागणारे धागे, किराणा असे सारे साहित्य विकायचे. त्यांनी आपले दुकान विकायचा निर्णय घेतल्यानंतर आगा आजगावकर यांनी ते दुकान घेण्याचा निर्धार केला. त्यावेळी दोघांनी मिळून सात रुपयांचे भांडवल उभे केले आणि 1880 मध्ये मेणसे गल्लीतील सुताचे दुकान चालवण्यास घेतले. त्यानंतर ही दुकानाची जागा दोघांच्या एकमताने आगा यांच्या नावावर करण्यात आली. पुढे 1915 मध्ये शंभर फूट अंतरावर दुसरी जागा खरेदी करुन तिथे फर्म हलवण्यात आले. ही जागा आजगावकर यांच्या नावे करण्यात आली. आज हे धागे, सूत आणि कपड्यांचे दुकान आगा-आजगावकरांचे दुकान म्हणून प्रसिद्ध आहे. या दोघा मित्रात कधीच वितुष्ट निर्माण झाले नाही. परस्परांवरील विश्वास, आपुलकीचे धागे मजबूत असल्याने आजही चौथी पिढी गुण्यागोविंदाने हा व्यवसाय करत आहे.

1908 साली ब्रिटीशांनी हिशेब लिहून कर भरा, असे फर्मान काढले. त्यानंतर सुरु झालेल्या करपावत्या आजही या चौथ्या पिढीकडे आहेत. दोन वेगळे धर्म असले तरी आगा- आजगावकर यांच्यात आजही एका कुटुंबाप्रमाणे वातावरण आहे.

सखाराम यांच्यानंतर त्यांचे पुत्र लक्ष्मण, नातू विनायक व पणतू मिलिंद तर मोदीनसाहेब यांच्यानंतर त्यांचे पुत्र युसुफ नजीर, नातू इब्राहिम व पणतू आरीफ हे या व्यवसायाची धुरा सांभाळत आहेत. सध्या असलेले दुकानही 1915 मध्ये बांधकाम झाले आहे. दर्शनी भिंतीवर मोदीनसाहेब आगा आणि सखाराम आजगावकर यांचे एकत्रित लावलेले फोटो आजही अनोख्या मैत्रीचे दर्शन घडवतात. चौथी पिढीही आता त्याच विश्वासाने एकत्र राहत असून ही मैत्री समाजासाठी आदर्शवत ठरली आहे.

आगा-आजगावकर कुटुंबातील अनेकजण बिल्डर, डॉक्टर, अभियंता होऊन अन्य व्यवसायात स्थिरस्थावर झाले आहेत. आम्ही एकमेकांचे उत्सव, लग्नसमारंभ अशा कार्यात हिरीरीने सहभागी होतो. दोन्ही कुटुंबात विश्वासाचा धागा अतूट असाच आहे.
– मिलिंद आजगावकर, फर्म चालक, बेळगाव

कोणताही व्यवसाय भागीदारीत करताना एकमेकांवर द़ृढ विश्वास असणे आवश्यक असते. यात जातीभेद न आणता फक्त व्यवसायावर लक्ष केंद्रित केले. प्रतिकुल काळात पूर्वजांनी जतन केलेले विश्वासाचे नाते अतूट असेच आहे.
– आरिफ आगा, फर्म चालक, बेळगाव

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news