सातारा, पुढारी वृत्तसेवा : सातारचे व कोल्हापूरचे राजे असलेल्या खासदारांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणार्या अॅड. गुणरत्न सदावर्ते यांची साताऱ्यातील पोलिस कोठडी संपली. त्यानंतर आज दुपारी सातारा जिल्हा न्यायालयात त्यांना हजर करण्यात आले. दरम्यान, यावेळी न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी दिली नाही. यामुळे आता सदावर्ते यांना सातारा पोलिस त्यांना पुन्हा आर्थर जेल मध्ये सोडणार आहेत.
सदावर्ते यांना सातारा पोलिसांनी चार दिवसांपूर्वी अटक केली. तेव्हापासून ते सातारा शहर पोलिसांच्या लॉकअपमध्ये आहेत. चार दिवसात त्यांच्या आवाजाचे नमुने घेऊन व घटनस्थळाचा पंचनामा केला. यासह अनेक मुद्द्यांवर चौकशी केली. आज पोलिस कोठडी संपणार असल्याने त्यांना जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. दोन्ही पक्षाने कोर्टासमोर युक्तिवाद केला. सरकार पक्षाने पुन्हा पोलिस कोठडी मागितली. मात्र न्यायालयाने बचाव पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून पोलिस कोठडी नाकारली.
चार दिवसांपूर्वी सातारा पोलिसांनी आर्थर जेल प्रशासनाकडून सदावर्ते यांना ताब्यात घेतले होते. आता त्यांना पुन्हा तेथेच सोडण्याची कार्यवाही होणार असल्याचे सातारा पोलिसांनी सांगितले.
हेही वाचा