गुजरात : सिद्धपूरमधील हिंदू मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी मुस्लिमांनी दिली देणगी; जातीय सलोख्याचे अनोखे उदाहरण

गुजरात : सिद्धपूरमधील हिंदू मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी मुस्लिमांनी दिली देणगी; जातीय सलोख्याचे अनोखे उदाहरण

पुढारी ऑनालाईन डेस्क : गुजरातमध्ये जातीय सलोख्याचे अनोखे उदाहरण समोर आले आहे. पाटण जिल्ह्यातील सिद्धपूर तालुक्यातील देठली गावामधील चामुंडा मातेच्या जुन्या मंदिराचा नुकताच एक कोटी रुपये खर्चून जीर्णोद्धार करण्यात आला. मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी गावातील मुस्लीम बांधवांकडून ११ लाख रूपयांची देणगी देण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर मंदिर व्यवस्थापनाने आयोजित केलेल्या तीन दिवसीय यज्ञात सहभागी होण्यासाठी मुस्लिम बांधवांकडून येणाऱ्या भाविकांना मोफत चहा काउंटरही सुरू करण्यात आला आहे.

जातीय सलोख्याचे अनोखे उदाहरण

देठली येथील आगाखान मोमीन समाजाचे स्थानिक नेते अकबर मोमीन यांनी सांगितले की, वर्षभरापूर्वी मंदिर व्यवस्थापनाने जुन्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर निधी गोळा केला जात होता. तेव्हा मुस्लिम समाजातील सदस्यांनी एकत्र येऊन मंदिर ट्रस्टला एकत्रितपणे ११ लाख ११ हजार १११ रुपये दिले. गावाची लोकसंख्या सुमारे ६ हजार आहे. त्यापैकी सुमारे ३० टक्के मुस्लिम समाजाचे आहेत. गावात आम्ही एकोप्याने राहतो. गावात कधीही जातीय हिंसाचार किंवा विसंगती पाहिली नसल्याचे त्यांनी सांगितले.

१२ ऑक्टोबरपासून मंदिर व्यवस्थापनाने तीन दिवसीय यज्ञाचे आयोजन केले आहे. मुस्लिम समाजाकडून येणाऱ्या भाविकांना मोफत चहा देणारा चहा काउंटर सुरु केला आहे. या काउंटरवर दररोज सुमारे ५० हजार कप चहा मोफत वितरीत केला जात असल्याचे मोमीन यांनी सांगितले.

एक महिन्यापासून सुरू होती यज्ञाची तयारी

येथील सुन्नी मुस्लिम समाजाचे ट्रस्टी इब्राहिम शेख म्हणाले की, समुदायाने मंदिर ट्रस्टला ५१ हजार रुपयांची देणगी दिली आहे. मंदिराद्वारे आयोजित यज्ञामध्ये सेवा देत आहोत. ट्रस्टला हा कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी विविध कामांमध्ये मदत करत आहे. गावामध्ये हिंदू मुस्लिम असा कोणताही भेदभाव केला जात नाही. सरपंच विक्रमसिंह दरबार यांनी मुस्लिमांसह सर्व समुदायांनी जीर्णोद्धरासाठी मदत केल्याचे सांगितले. या कार्यक्रमासाठी गावकरी एक महिन्यापासून तयारी करत असून मुस्लिम बांधव हे या तयारीचा अविभाज्य भाग असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news