अहमदाबाद : पुढारी ऑनलाईन; गुजरातमधील विधानसभा निवडणुकीत (Gujarat Election Results) भाजपने १५३ जागांवर आघाडी घेत विक्रमी बहुमताच्या दिशेने वाटचाल केली आहे. तर काँग्रेस केवळ २० जागांवर आघाडीवर आहे. दरम्यान, या ऐतिहासिक विजयानंतर आता भाजपकडून शपथविधीची तयारी केली जात आहे. गुजरातमध्ये भुपेंद्र पटेल (Gujarat CM Bhupendra Patel) यांच्या सरकारच्या शपथविधीचा मुर्हूत ठरला आहे. हा शपथविधी सोहळा १२ डिसेंबरला दुपारी २ वाजता होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा या शपथविधी सोहळ्यात उपस्थित राहतील, अशी माहिती भाजपचे गुजरात प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील यांनी दिली आहे.
गुजरात निवडणुकीचे निकालाचे चित्र स्पष्ट झाले आहे. गुजरातमध्ये विकासाचा प्रवास पुढे चालू ठेवण्याचा निर्धार लोकांनी केला आहे. जनादेश आम्ही नम्रपणे स्वीकारतो. भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता जनसेवेसाठी कटिबद्ध आहे, अशी प्रतिक्रिया गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी भाजपच्या विजयानंतर दिली आहे.
गुजरातमध्ये पुन्हा डबल इंजिन सरकार आल्यामुळे भाजप कार्यकर्ते जल्लोष करत आहेत. गुजरातमधील भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार भुपेंद्र पटेल यांनी घाटलोडियाच्या शहरी मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला आहे. दरम्यान, गुजरातमधील मोठ्या विजयानंतर पंतप्रधान मोदी आज संध्याकाळी सहा वाजता भाजपच्या मुख्यालयात पोहोचतील. तेथे ते भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत.
निवडणूक आयोगाच्या १२ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार भाजपला आतापर्यंत ५३ टक्के मते मिळाली आहेत, तर काँग्रेसला २७ टक्के आणि आपला १३ टक्के मते मिळाली आहेत. १९९५ पासून गुजरातमध्ये भाजपला कोणी हरवू शकलेला नाही. २०१७ मध्ये भाजपने ९९ जागा जिंकल्या होत्या, तर काँग्रेसला ७७ जागा मिळाल्या होत्या. पण यावेळी काँग्रेसला मोठा धक्का देत भाजपने विक्रमी बहुमताकडे वाटचाल केली आहे.
भुपेंद्र पटेल हे दुसऱ्यांदा गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होत आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल घाटलोडिया विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार आहेत. त्यांनी मोठा विजय मिळवला आहे. यापूर्वी माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल या घाटलोडियामधून आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. २०१२ च्या गुजरात निवडणुकीत आनंदीबेन पटेल यांनी काँग्रेसच्या रमेशभाई पटेल यांचा १ लाख १० हजार मतांनी पराभव केला होता. यानंतर आनंदीबेन गुजरातच्या मुख्यमंत्री झाल्या. तर २०१७ मध्ये भूपेंद्र पटेल यांनी काँग्रेसच्या शशिकांत भुराभाई यांचा १ लाख १७ हजार मतांनी पराभव केला होता. त्यानंतर पटेल मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले होते. सध्याच्या निवडणुकीत भाजपने या जागेवरून विद्यमान मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांना पुन्हा उमेदवारी दिली. त्यांचा सामना काँग्रेसच्या अमी याज्ञनिक आणि आम आदमी पक्षाचे विजय पटेल यांच्याशी झाला. (Gujarat Election Results)
हे ही वाचा :