पुढारी ऑनलाईन : जीवनाश्यक वस्तूंचे दर आटोक्यात आणण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. आता सरकार सर्वसामान्यांना भारत ब्रँड अंतर्गत गव्हाचे पीठ (आटा), डाळी नंतर तांदूळ (Bharat rice) सवलतीच्या दरात पुरवणार आहे. हा तांदूळ २५ रुपये किलो दराने विकला जाईल, असे एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने सांगितले. तांदळाचे दर नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने ही योजना आखली आहे.
हा तांदूळ नॅशनल अॅग्रिकल्चरल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया (Nafed), नॅशनल को-ऑपरेटिव्ह कंझ्युमर्स फेडरेशन (NCCF) आणि केंद्रीय भंडार आउटलेट आणि मोबाईल व्हॅनद्वारे विकला जाणार आहे. सरकार आधीपासून गव्हाचे पीठ आणि डाळीचा या ब्रँडखाली पुरवठा करत आहे.
Livemint.com च्या वृत्तानुसार, एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार पुढील वर्षी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांपर्यंत जीवनाश्यक खाद्यपदार्थांच्या वाढत्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकार २५ रुपये सवलतीच्या दराने 'भारत राइस' सादर करण्याचा विचार करत आहे.
देशभरात तांदळाच्या किरकोळ किमतीत लक्षणीय वाढ होत असताना हा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या तांदळाचा किरकोळ सरासरी दर प्रति किलो ४३ रुपयांवर पोहोचला आहे. जो मागील वर्षाच्या तुलनेत १४ टक्क्यांनी अधिक आहे.
सध्या केंद्र सरकार भारत गव्हाचे पीठ आणि चणा डाळ अनुक्रमे प्रति किलो २७.५० रुपये आणि ६० रुपये या सवलतीच्या दराने पुरवते. ही उत्पादने सुमारे २ हजार किरकोळ केंद्रावर वितरीत केली जातात. भारत तांदूळ (Bharat rice) विक्रीची प्रक्रिया भारत डाळ आणि गव्हाच्या पीठाप्रमाणेच असण्याची शक्यता आहे.
गेल्या काही महिन्यांत सरकारने जीवनाश्यक अन्नधान्याच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत. ज्यात गैर-बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदीचा समावेश आहे.
भारतीय अन्न महामंडळाने (FCI) देशांतर्गत बाजारपेठेत उपलब्धता वाढवण्यासाठी खुल्या बाजार विक्री योजनेअंतर्गत (OMSS) तांदूळ देऊ केला आहे. नोव्हेंबरमध्ये अन्नधान्याच्या किमती १०.३ टक्क्यांनी वाढल्या आहेत. ज्यामुळे ऑक्टोबरमधील ६.६१ टक्क्यांवरून एकूण अन्नधान्य महागाई ८.७ टक्क्यांपर्यंत वाढली आहे. अन्नधान्याच्या महागाईतील ही वाढ एकूण ग्राहक किंमत निर्देशांकाचा (CPI) महत्त्वाचा घटक आहे.
हे ही वाचा :