पुढारी ऑनलाईन : गुगल (Google) आणि Alphabet Inc चे सीईओ सुंदर पिचाई (Google CEO Sundar Pichai) यांनी शुक्रवारी वॉशिंग्टनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांची भेट घेतली. त्यानंतर पिचाई यांनी भारताच्या डिजिटायझेशन फंडमध्ये त्यांची कंपनी १० अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा केली. गुगल गुजरातमध्ये त्याचे ग्लोबल फिनटेक ऑपरेशन्स सेंटर सुरु करेल आणि भारताच्या डिजिटायझेशन फंडमध्ये १० अब्ज डॉलरची गुंतवणूक करेल, असे त्यांनी सांगितले. (PM Modi US Visit)
पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकेचा तीन दिवसांचा दौरा केला. त्यांनी या दौऱ्यात मायक्रॉन आणि अप्लाइड मटेरियल्ससह प्रमुख जागतिक कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेतली. या दोन कंपन्यांनी भारतात गुंतवणूक करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
चेन्नईत जन्मलेले मूळ भारतीय वंशाचे Google चे सीईओ पिचाई यांनी म्हटले आहे की, "अमेरिकेच्या ऐतिहासिक दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदींना भेटणे हा एक सन्मान होता. आम्ही पीएम मोदींशी बोलताना सांगितले की, Google भारताच्या डिजिटायझेशन फंडात १० अब्ज डॉलरची गुंतवणूक करत आहे."
पिचाई पुढे म्हणाले, "आम्ही गुजरातमध्ये आमचे ग्लोबल फिनटेक ऑपरेशन्स सेंटर उघडण्याची घोषणा करत आहोत. याबद्दल आम्ही उत्साहित आहोत." "डिजिटल इंडियासाठी पीएम मोदींचे व्हिजन त्यांच्या काळाच्या खूप पुढे होते. मी आता याकडे ब्लू प्रिंट म्हणून पाहतो जे इतर देश करू पाहत आहेत," असे पिचाई यांनी पीएम मोदी यांच्या सोबतच्या भेटीनंतर सांगितले. पिचाई आणि मोदी यांची गेल्या वर्षी नवी दिल्ली येथे भेट झाली होती.
पंतप्रधान मोदींनी त्यांच्या दौऱ्याच्या तिसऱ्या आणि शेवटच्या दिवशी वॉशिंग्टनमध्ये अॅमेझॉनचे सीईओ अँड्र्यू जॅसी आणि बोईंगचे डेव्हिड एल कॅलहॉन यांचीही भेट घेतली. पीएम मोदी अमेरिका दौरा संपवून इजिप्तला रवाना झाले आहेत.
बोइंगचे सीईओ कॅलहॉन यांनी एएनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, "सर्वात महत्त्वाचे म्हणजे पीएम मोदी भारताला विकासाच्या दिशेने नेत आहेत. त्यांना विमान उड्डाण क्षेत्र, एरोस्पेसमध्ये विशेष स्वारस्य आहे. हे एक मोठे व्हिजन आहे." भारताचा केवळ देशासाठीच नव्हे, तर विमान वाहतूक आणि एरोस्पेसमध्ये व्यापक क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असल्याच्या महत्त्वावर भर आहे.
ॲमेझॉनचे सीईओ अँडी जॅस्सी यांनी मोदींसोबतच्या भेटीनंतर भारतात अतिरिक्त रोजगाराच्या संधी निर्माण करण्याची वचनबद्धता व्यक्त केली. "आम्हाला रोजगाराच्या अधिक संधी निर्माण करायच्या आहेत. लहान आणि मध्यम आकाराच्या व्यवसायांचे डिजिटायझेशन करण्यात मदत करणे आणि अनेक भारतीय कंपन्या आणि त्यांची उत्पादने जगभरात निर्यात करण्यासाठी आम्ही मदत करू," असे जॅसी यांनी म्हटले आहे.
हे ही वाचा :