फडणवीस, मुनगंटीवारांना डी.लिट पदवी देण्याचा निर्णय; संघटनांचा विरोध

फडणवीस, मुनगंटीवारांना डी.लिट पदवी देण्याचा निर्णय; संघटनांचा विरोध

गडचिरोली, पुढारी वृत्तसेवा : गोंडवाना विद्यापीठाने नुकताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना डी.लिट पदवीने सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा विविध सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांनी तीव्र विरोध केला असून, निर्णय तत्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे.

जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक चांदेकर भवन येथे झाली. या बैठकीत विद्यापीठाने फडणवीस व मुनगंटीवार यांना डी.लिट पदवी बहाल करण्याच्या निर्णयाला विरोध करण्यात आला. गोंडवाना विद्यापीठ ही एक सार्वजनिक संस्था आहे. परंतु कुलगुरू बोकारे हे या विद्यापीठाला त्यांच्या आवडीच्या एका पक्षाचा अथवा विचारधारेचा प्रचार करण्याचे केंद्र बनवून आपली पाठ थोपटून घेत आहेत. हा प्रकार निश्चितच निषेधार्ह आहे. असे मत यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. यापूर्वीसुद्धा गोंडवाना विद्यापीठाने अनेक वादग्रस्त व एका विशिष्ट विचारधारेला अनुकूल असे निर्णय घेतलेले आहेत. यावरून हे विद्यापीठ सर्व जनतेचे की, एका विचारधारेच्या प्रचाराचे केंद्र आहे, असा प्रश्न निर्माण झाला असून कुलगुरु डॉ. बोकारे यांची उचलबांगडी करावी, अशी मागणी केली आहे.

अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे केंद्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत, शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते, अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे जिल्हाध्यक्ष विलास निंबोरकर, भाकपचे देवराव चवळे, माकपचे अमोल मारकवार, प्रसिध्द कवयित्री कुसुम अलाम, संविधान फाऊंडेशनचे गौतम मेश्राम, गडचिरोली सिटिझन फोरमचे हेमंत डोर्लीकर, मुव्हमेंट फॉर जस्टिसचे धर्मानंद मेश्राम, भारतीय बौद्ध महासभेचे प्रा.गौतम डांगे, आदिवासी विकास युवा परिषदेचे कुणाल कोवे, विनोद मडावी, सम्यक समाज समितीचे हंसराज उंदिरवाडे, रिपब्लिकन महिला आघाडीच्या ज्योती उंदिरवाडे, कल्पना रामटेके, युवा कार्यकर्ते नागसेन खोब्रागडे, रिपब्लिकन पक्षाचे प्रल्हाद रायपुरे, नरेंद्र रायपुरे आदींनी भाजप नेत्यांना मानद डी.लिट पदवी देण्याच्या विद्यापीठाच्या निर्णयाला विरोध केला आहे. याबाबत विद्यापीठाने आपला निर्णय मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा या संघटनांनी दिला आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news