Zeeshan Siddiqui | झिशान सिद्दीकींना मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून हटवले, नव्या नावाची घोषणा | पुढारी

Zeeshan Siddiqui | झिशान सिद्दीकींना मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून हटवले, नव्या नावाची घोषणा

पुढारी ऑनलाईन : झिशान सिद्दीकी (Zeeshan Siddiqui) यांना मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्ष पदावरून हटवल्यात आले आहे. त्यांच्या जागी आता अखिलेश यादव हे मुंबई युवक काँग्रेसचे नवे अध्यक्ष बनले आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला झिशान सिद्दीकी यांचे वडील बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेसचा हात सोडून अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. यानंतर आता बाबा सिद्दीकी यांचे आमदार चिरंजीव झिशान सिद्दीकी यांच्यावर काँग्रेसने कारवाई केली आहे. झिशान सिद्दीकी हे बाबा सिद्दीकी यांचे चिरंजीव आहेत. ते वांद्रे पूर्व मतदारसंघाचे आमदार आहेत.

बाबा सिद्दीकी हे वांद्रे पश्चिमचे माजी आमदार आहेत; तर झीशान हे २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत वांद्रे पूर्व मतदारसंघातून विजयी झाले होते. वयाच्या २७ व्या वर्षी ते आमदार झाल्यामुळे ते चर्चेत आले होते. बाबा सिद्दीकी हे काँग्रेसचे दिवंगत नेते व माजी केंद्रीय मंत्री मुरली देवरा यांच्या गटाचे मानले जातात.

देवरा यांच्यासह काँग्रेसचे माजी खासदार सुनील दत्त यांच्याशीही त्यांचे निकटचे राजकीय संबंध होते. मात्र, मुरली देवरा यांचे पुत्र मिलिंद यांनी काँग्रेसला सोडचिट्ठी देऊन शिवसेनेच्या शिंदे गटात नुकताच प्रवेश केला. मिलिंद यांच्या राजकीय निर्णयानंतर बाबा सिद्दीकी यांनीही काॅंग्रेसची साथ सोडली.

मिलिंद यांच्या राजकीय निर्णयानंतर त्यांच्यासोबत सिद्दीकी पिता-पुत्रसुद्धा शिंदे गटात प्रवेश करतील, अशी चर्चा होती. मात्र सिद्दीकी यांचा मतदारसंघ मुस्लिमबहुल असल्यामुळे निवडणुकीत ते शिवसेनेला मतदान करणार नाहीत, अशी शक्यता धरून सिद्दीकी यांनी आपला मोर्चा अजित पवार गटाकडे वळविला. बाबा सिद्दीकी यांच्या प्रवेशानंतर काँग्रेसचे आणखी दोन आजी-माजी आमदार अजित पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे.

Image

हे ही वाचा :

 

Back to top button