पुढारी ऑनलाईन डेस्क : आठवड्याच्या चौथ्या दिवशी गुरुवारी सोने आणि चांदीच्या दरात (Gold Silver Price) तेजी दिसून आली. आज सराफा बाजारात १० ग्रॅम शुद्ध सोन्याचा दर ५१,८१५ रुपयांवर खुला झाला. काल बुधवारी सोन्याचा दर ५१,५६६ रुपयांवर जाऊन बंद झाला होता. पुढील काही दिवसांत सोन्याचा दर ५२ हजारांवर राहील, अशी शक्यता सराफा बाजारातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. चांदीच्या दरातही तेजी आली आहे. चांदीच्या दरात किलोमागे २५० रुपयांची वाढ झाली आहे.
इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोशिएशनच्या माहितीनुसार, (Gold Silver Price) २४ ग्रॅम सोने ५१,८१५ रुपये, २३ कॅरेट सोने ५१,६०८ रुपये, २२ कॅरेट ४७,४६३ रुपये, १८ कॅरेट ३८,८६१ रुपये आणि १४ कॅरेट सोन्याचा दर ३०,३१२ रुपये होता. चांदीचा प्रति किलो दर ५७,३०९ रुपयांवरून ५७,५९८ रुपयांवर पोहोचला आहे.
मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याच्या दरात वाढ सुरुच आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने- चांदी दरात वाढ होत असल्याचा परिणाम देशांतर्गत बाजारात दिसून येत आहे. यामुळे सोन्याचे दर वाढत असल्याचे दिसून येत आहे.
सराफा बाजारात २४ कॅरेट सोने सर्वांत शुद्ध सोने समजले जाते. मात्र दागिने बनविण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. त्यात ९१.६६ टक्के सोने असते. दागिन्यांच्या शुद्धतेसाठी हॉलमार्क संबंधित ५ चिन्हे असतात. २४ कॅरेट सोन्यावर ९९९, जर २२ कॅरेट सोन्याचा दागिना असेल तर त्यावर ९१६, २१ कॅरेट दागिन्यावर ८७५ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर ७५० असे लिहिलेले असते. जर दागिना १४ कॅरेटचा असेल तर त्यावर ५८५ असे लिहिलेले असते.