पहिल्या दिवशी गौरी आवाहन झाल्यानंतर दुसर्या दिवशी शुक्रवारी (दि. 22) गौरी पूजन होणार आहे. माहेरवाशीण गौरींना 'महालक्ष्मी' असेही संबोधिले जाते. महालक्ष्मी पूजनाचा दिवस शुक्रवारी (दि.22) आल्यामुळे देवीचा वार आणि गौरी पूजन असा दुहेरी योग जुळून आला आहे. पुरणपोळीसह पंचपक्वान्नांचा नैवेद्य दाखवला जाणार आहे. तसेच विविध पदार्थ, फळे यांची आरास मांडण्यात येणार आहेत. दरवर्षी गौरी पूजनाच्या दिवशी पूजा आणि आरती केल्यानंतर गौरीला पुरणपोळी, कुरडई-पापड, सोळा भाज्यांची एकत्र भाजी, लाडू, फराळ, वरण-भात, बटाट्याची भाजी अशा विविध पदार्थांचा नैवेद्य दाखविण्यात येतो. कढी, कटाची आमटी, वेगवेगळ्या प्रकारची भजी, पापड, लोणचे यांचाही समावेश असतो. यानिमित्ताने सायंकाळी हळदी-कुंकूचा कार्यक्रम आयोजित केला जातो.