Ganesh Chaturthi 2023 : धारावीत मानवी मस्तक असलेल्या गणपतीच्या दर्शनास भक्तांची गर्दी 

Ganesh Chaturthi 2023 : धारावीत मानवी मस्तक असलेल्या गणपतीच्या दर्शनास भक्तांची गर्दी 

धारावी : पुढारी वृत्तसेवा : धारावी नव्वद फूट रस्त्यावरील शक्ती विनायक असोसिएशन, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा तामिळनाडू राज्यातील थिरुवरुर पुनहोटम गावातील जगातील एकमेव मानवी मस्तक असलेल्या मंदिराची प्रतिकृती साकारली आहे. या मंदिरात मानवी मस्तक असलेली आदी विनायकाची मूर्ती धारावीत आकर्षणाचा केंद्रबिंदू बनली असून या मानवी स्वरूप आदी विनायकाचे दर्शन घेण्यासाठी इंदिरानगर परिसरात गणेश भक्तांची गर्दी उसळत आहे. (Ganesh Chaturthi 2023)

संबंधित बातम्या : 

दरवर्षी विविध देखावे सादर करून गणेश भक्तांना आपल्याकडे आकर्षित करणाऱ्या मंडळाने यंदाच्या वर्षी जगातील एकमेव मंदिर म्हणून सुप्रसिद्ध असलेल्या बहुचर्चित तामिळनाडू राज्यातील थिरुवरुर पुनहोटम मधील आदी विनायक मंदिराला भेट दिली. मानवी मस्तकासह सिंहासनावर आरूढ झालेली दोन हात असलेल्या विनायकाचे विशिष्ट स्वरूप पाहून त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. लागलीच त्यांनी मंदिराचे पुजारी तसेच त्या गावातील लोकांशी संवाद साधून आदी विनायकाच्या विशिष्ट रूपाबद्दल माहिती जाणून घेतली. त्यांना समजले कि या गणपतीची ओळख नरमुख विनायक म्हणून जगभरात आहे. वडिलांकडून शिरच्छेद करण्यापूर्वीचे हे रूप असून गेल्या हजारो वर्षांपासून या मानवी मस्तक असलेल्या आदी विनायकाची पूजा मोठ्या भक्ती भावाने आजही केली जाते.

मंडळातील कार्यकर्त्यांनी त्याच गावातील एका मूर्ती कला केंद्राला भेट देऊन आदी विनायकाच्या हुबेहूब मुर्ती व हत्तीचे मस्तक हातात घेतलेल्या भगवान शंकरासह हातात शिवलिंग घेऊन बसलेल्या माता पार्वतीची मूर्ती बनवून घेतली. मोठ्या भक्तिभावाने त्या मूर्तीची स्थापना केली. गणपतीचे आगळे वेगळे रूप धारावीत चर्चेचा विषय बनला असून या अनोख्या मूर्तीचा इतिहास जाणून घेण्यासाठी भक्त मंडळाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत असल्याचे चित्र दिसत आहे.

शक्ती विनायक असोसिएशन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे यंदा ३० वे वर्ष असून मंडळाच्या वतीने वर्षभर सामाजिक उपक्रमासह राष्ट्रीय सण मोठ्या जल्लोषात साजरे केले जातात. या मूर्तीची स्थापना करण्यामागे चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती असलेल्या गणपतीचे हे अनोखे रूप जगासमोर यावे हा एकमात्र उद्देश असल्याचे मंडळाचे मंडळाचे अध्यक्ष महेश बालकृष्णन, सचिव लोकेश मुरुगन, खजिनदार नीतीराज नटराजन यांनी सांगितले.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news