Maharashtra Winter Session 2022 : कर्नाटकला मस्ती असेल तर आपणही धरणांची उंची वाढवावी

Maharashtra Winter Session 2022 : कर्नाटकला मस्ती असेल तर आपणही धरणांची उंची वाढवावी
Published on
Updated on

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : कर्नाटक सरकारकडून सीमाभागातील मराठी माणसांवर पाळत ठेवली जात आहे. तेथील मराठी माणसांना जाणीवपूर्वक त्रास दिला जात आहे. त्यासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री ज्या भाषेत बोलतात, त्याच भाषेत आपणही त्यांना उत्तर दिले पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांनी मंगळवारी विधानसभेत केली. कर्नाटकला जर मस्ती चढली असेल तर आपणही कोयना, वारणा आणि सातारा जिल्ह्यातील धरणांची उंची वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. त्याशिवाय ते वठणीवर येणार नाहीत. महाराष्ट्राला वेठीस धरण्याचे काम होत असेल तर ते खपवून घेऊ नका, असेही पाटील यांनी सरकारला बजावले. (Maharashtra Winter Session 2022)

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने सोमवारी बेळगाव येथे महामेळाव्याचे आयोजन केले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे कोल्हापूर जिल्ह्यातील नेते हसन मुश्रीफ मेळाव्याला जाणार होते. त्यांना कर्नाटक पोलिसांच्या दडपशाहीचा सामना करावा लागला. जयंत पाटील यांनी स्थगन प्रस्तावाद्वारे कर्नाटकच्या या दादागिरीकडे सभागृहाचे लक्ष वेधले. (Maharashtra Winter Session 2022)

सीमाभागात मराठी बांधवांचे संमेलन भरवण्यात आले होते. या संमेलनात महाराष्ट्रातील एकही नेता पोहोचणार नाही, अशी व्यवस्था कर्नाटक सरकारने केली होती. माजी मंत्री हसन मुश्रीफ तेथील मराठी माणसांच्या समर्थनासाठी तिथे पोहोचले असता त्यांच्यावर लाठी उगारली गेली. हे अत्यंत चुकीचे आहे, असेही जयंत पाटील म्हणाले. दरम्यान, हसन मुश्रीफ यांनी सीमाभागातील मराठी माणसांच्या व्यथा मांडल्या. मराठी भाषिकांना जमिनीचा सातबारा उतारा कन्नड भाषेत दिला जात असून त्यांची जमीन कमी कमी होत चालली आहे. कर्नाटकने अलमट्टी धरणाची उंची वाढविण्यासाठी निविदा काढली आहे. अलमट्टीची उंची वाढली तर आपल्या राज्यातील दोन जिल्हे बुडतील, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.

अधिक वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news