Maharashtra Winter Session 2022 : विकासकामांच्या स्थगितीवरून विरोधक आक्रमक; विधानसभेत गदारोळ | पुढारी

Maharashtra Winter Session 2022 : विकासकामांच्या स्थगितीवरून विरोधक आक्रमक; विधानसभेत गदारोळ

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : राज्यात सत्तांतर होऊन सत्तेवर आलेल्या शिंदे – फडणवीस सरकारने विरोधी पक्षातील आमदारांच्या मतदारसंघातील विकासकामांना दिलेल्या स्थगितीवरून मंगळवारी विधानसभेत प्रचंड गदारोळ झाला. विकासकामांवरील स्थगिती ताबडतोब उठवावी या मागणीसाठी विरोधी पक्षाने आक्रमक पवित्रा घेत जोरदार घोषणाबाजी केली. या गदारोळात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारून कामकाज पुढे नेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेच्या आमदारांनी अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत धाव घेत घोषणाबाजी सुरू केली. यावेळी गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज चार वेळा तहकूब करावे लागले. (Maharashtra Winter Session 2022)

अखेर या विकासकामावरील स्थगितीच्या मुद्द्यावर हिवाळी अधिवेशन संपण्यापूर्वी बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्यानंतर विरोधक शांत झाले व कामकाज सुरळीत झाले. (Maharashtra Winter Session 2022)

आमचे सरकार सर्वांना सोबत घेऊन चालणारे सरकार आहे. त्यामुळे अधिवेशन संपण्यापूर्वी विरोधी पक्षनेते आणि सर्व गटनेत्यांची बैठक घेऊन विकासकामावरील स्थगितीबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे शिंदे यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांच्या या आश्वासनानंतर विरोधक शांत झाले व सभागृह कामकाज सुरळीत झाले. (Maharashtra Winter Session 2022)

अर्थसंकल्पात मंजूर केलेल्या कामांना स्थगिती : अजित पवार (Maharashtra Winter Session 2022)

मंगळवारी विधानसभेत कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विरोधी बाकांवरील आमदारांच्या मतदारसंघातील विकासकामांना सरकारने दिलेल्या स्थगितीचा मुद्दा उपस्थित केला. राज्य सरकारने अर्थसंकल्पात तरतूद केलेल्या आणि मंजूर केलेल्या अर्थसंकल्पातील विकासकामांना राज्य सरकारने स्थगिती दिली आहे. या संदर्भात मुख्यमंत्र्यांना अनेकदा भेटूनही निर्णय झालेला नाही, असे अजित पवार म्हणाले.

कामे गुजरात, कर्नाटक किंवा तेलंगणाची नव्हे : अजित पवारांचा सरकारला टोला

राज्यात सरकार येत असते आणि जात असते. मात्र, कोणत्याही सरकारने मंजूर केलेली कामे कधी थांबवली नव्हती. माझी सभागृहातील सातवी टर्म आहे. मी युतीचे मनोहर जोशी, नारायण राणे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार पाहिले. त्यांनीही कधी अशी स्थगिती दिली नव्हती. ती शिंदे सरकारने दिली, असा टोला लगावतानाच ही विकासकामे महाराष्ट्रातील आहेत. ती काही गुजरात, कर्नाटक किंवा तेलंगणाची नाहीत, असे अजित पवार म्हणाले.

काही गोष्टी तुमच्याकडूनच शिकलो : फडणवीसांचा प्रतिटोला

त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा हल्ला परतवून लावताना आम्ही काही गोष्टी तुमच्याकडून शिकलो आहोत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर आमची कामे त्यांनी रोखली होती. गेल्या अडीच वर्षांत तुमच्या सरकारने भाजपच्या लोकांना एक नवा पैसा दिला नाही. तथापि आम्ही बदल्याची भावना ठेवणारे लोक नाही, असा प्रतिटोला फडणवीस यांनी लगावला.

आमच्या सरकारने 70 टक्के कामावरील स्थगिती उठवली आहे. उर्वरित 30 टक्के कामे अशी आहेत की, ज्यात तरतुदीचा नियम पाळला गेला नाही. सरकारच्या शेवटच्या काळात जेथे दोन हजार कोटी रुपयांची तरतूद आहे, तेथे सहा हजार कोटी रुपयांचे कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. त्यासाठी पैसे आणायचे तरी कुठून, असा सवालही फडणवीस यांनी विरोधकांना केला.

फडणवीस यांच्या या उत्तराने विरोधी बाकावरील आमदार संतप्त झाले. त्यांनी विधानसभा अध्यक्षांच्या समोरील मोकळ्या जागेत येऊन पुन्हा घोषणा द्यायला सुरुवात केली. विशेष म्हणजे सरकार विरोधात घोषणा देण्यात माजी मंत्री आमदार आदित्य ठाकरे आघाडीवर होते. वारंवार सूचना करूनही विरोधी पक्षातील आमदारांची घोषणाबाजी थांबत नसल्याचे पाहून राहुल नार्वेकर यांनी प्रश्नोत्तरे पुकारून कामकाज पुढे नेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर गोंधळ आणखी वाढल्याने सलग चार वेळा सभागृहाचे कामकाज तहकूब करावे लागले.

अध्यक्षांच्या दालनात तोडगा

वारंवार कामकाज स्थगित होत असल्याने विधानसभा अध्यक्षांच्या दालनात बैठक होऊन या प्रश्नावर तोडगा निघाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिवाळी अधिवेशन संपण्यापूर्वी विरोधी पक्षनेते आणि सर्व गटनेत्यांची बैठक घेऊन विकासकामावरील स्थगिती उठविण्याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन दिल्यानंतर हा गदारोळ थांबला.

अधिक वाचा :

Back to top button