मुंबई, पुढारी वृत्तसेवा : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सर्वच राजकीय पक्षांनी महत्त्व दिलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक 2,193 ग्रामपंचायतींत वर्चस्व मिळवून ग्रामीण महाराष्ट्रात जोरदार मुसंडी मारली. भारतीय जनता पक्ष आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आघाडीने एकत्रित 2,996 ग्रामपंचायती खेचून आणल्या. शिवसेना-ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडीला सत्तेसाठी संघर्ष करावा लागला.
मविआने 2,950 ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळवले. भाजप-शिंदे आघाडी आणि मविआ यांच्यात फारच थोड्या ग्रामपंचायतींचा फरक पडला आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर प्रथमच ग्रामीण जनतेने भाजपला मोठे बळ देताना हा संमिश्र कौल दिला. काँग्रेसला अनेक ठिकाणी जोरदार धक्का बसला.
महाविकास आघाडी नंबर वन ठरली आहे. राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेच्या या आघाडीला 3 हजार 226, भाजपा – शिंदे गट 2 हजार 996 तर 1589 ग्रामपंचायतींवर अपक्षांनी झेंडा फडकवला आहे.
राज्य निवडणूक आयोगाने 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा केली होती. त्यापैकी 616 ग्रामपंचायतींच्या सरपंच व सदस्य पदांसाठीची निवडणूक बिनविरोध झाली होती. उर्वरित 7 हजार 135 ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान झाले होते. राज्य निवडणूक आयोगाच्या अंदाजानुसार या निवडणुकीत 74 टक्के मतदान झाले. मंगळवारी विविध ठिकाणी झालेल्या मतमोजणीनंतर महाविकास आघाडीने सर्वाधिक ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळविल्याचे दिसते.
राज्यातून महाविकास आघाडीची सत्ता गेल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक होती. त्यामुळे आघाडीतील राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर सर्वाधिक परिणाम होईल, असे बोलले जात होते. प्रत्यक्षात राष्ट्रवादीने आपल्या मित्रपक्षांच्या तुलनेत सर्वाधिक 1650 ग्रामपंचायती ताब्यात घेतल्या आहेत. त्याखालोखाल काँग्रेस 910 तर शिवसेनेने (उद्धव ठाकरे) 666 जागांवर समाधान मानले आहे. ठाकरे गटाचे हे नुकसान अपेक्षित होते. पक्षातून 40 आमदार फुटल्याने असे चित्र निर्माण झाल्याचे शिवसेनेनेही खाजगीत मान्य केले आहे.
राज्यातील सत्ता आणि शिंदे गटासोबत युती असल्यामुळे सर्वाधिक ग्रामपंचायतींवर आमचा झेंडा फडकेल, असा दावा भाजपाच्या नेत्यांचा होता. राष्ट्रवादीपेक्षा भाजपाने अधिक म्हणजे 2096 ग्रामपंचायतींमध्ये यश मिळवले आहे. शिंदे गटाने 803 ग्रामपंचायती जिंकत सार्वत्रिक निवडणुकीतील आपली ताकद दाखवली आहे. सत्तेतील हे मित्रपक्ष महाविकास आघाडीच्या संख्यांबळाजवळ पोहचले असले तरी, एकप्रकारे ही त्यांच्यासाठी धोक्याची घंटा असल्याचे बोलले जात आहे.
भाजपा – 2193
राष्ट्रवादी – 1650
काँग्रेस – 910
बाळासाहेबांची शिवसेना – 803
शिवसेना उद्धव ठाकरे – 666
अपक्ष – 1589