Hemant Soren | ब्रेकिंग : झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ५ दिवसांची ईडी कोठडी

हेमंत साेरेन ( संग्रहित छायाचित्र )
हेमंत साेरेन ( संग्रहित छायाचित्र )

पुढारी ऑनलाईन : जमीन फसवणूक घोटाळा प्रकरणात अटकेत असलेले झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि जेएमएमचे कार्यकारी अध्यक्ष हेमंत सोरेन (Hemant Soren) यांना ५ दिवसांची ईडी कोठडीत सुनावण्यात आली आहे. हेमंत सोरेन यांना ३१ जानेवारी रोजी कथित जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केली होती.

दरम्यान, ईडीने केलेल्या अटकेच्या विरोधात हेमंत सोरेन यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना झारखंड उच्च न्यायालयात जाण्यास सांगितले आहे. यामुळे हेमंत सोरेन यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

झारखंडमधील जमीन घोटाळा प्रकरणी हेमंत सोरेन यांची सात तासांपेक्षा जास्त वेळ चौकशी केल्यानंतर ईडीने ३१ जानेवारी रोजी त्यांना अटक केली होती. झारखंडच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. यानुसार अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) पथकाने सोरेन यांना गुरुवारी न्यायालयात हजर केले होते. पण न्यायालयाने सोरेन यांच्या कोठडीचा निर्णय राखून ठेवला होता. त्यावर आज शुक्रवारी सुनावणी होऊन हेमंत सोरेन यांना ५ दिवसांची ईडी कोठडी सुनावण्यात आली.

दरम्यान, 'झारखंड मुक्ती मोर्चा'चे नेते चंपाई सोरेन यांनी आज रांची येथील राजभवनात झारखंडचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. (Jharkhand New CM) चंपाई सोरेन यांना राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी पद आणि गोपनियतेची शपथ दिली. 'झामुमो' उपाध्यक्ष चंपाई सोरेन यांच्यासोबतच काँग्रेस पक्षाचे आलमगीर आलम आणि राजदचे सत्यानंद भोक्ता यांनीदेखील राज्य कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. परंतु झारखंडचे नवनियुक्त मुख्यमंत्री चंपाई यांना राज्यपालांनी १० दिवसांत बहुमत सिद्ध करण्यास सांगितले आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

हेमंत सोरेन यांची ईडी चौकशी रांचीमधील बडगई भागातील लष्‍कराच्‍या मालकीच्‍या ४.५५ एकर जमिनीच्‍या खरेदी-विक्रीशी संबंधित आहे. या प्रकरणी महसूल उपनिरीक्षक भानू प्रताप यांनाही अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी ईडीने सोरेन यांना १४ ऑगस्ट २०२३ रोजी पहिले समन्स जारी केले होते. यानंतर सोरेन यांना सात समन्स बजावले होते पण ते तपास यंत्रणेसमोर हजर झाले नाहीत. अखेर २० जानेवारीला आठव्‍या समन्सनंतर त्यांनी आपले म्हणणे नोंदवले. या प्रकरणी आतापर्यंत १४ जणांना अटक झाली आहे. यामध्‍ये २०११ बॅचचे आयएएस अधिकारी छवी रंजन यांचाही समावेश आहे.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news