मुंबई ः पुढारी वृत्तसेवा : सांगली आणि भिवंडी हे दोन मतदारसंघ मिळत नसल्याने मैत्रीपूर्ण लढतीचा पर्याय चाचपून पाहणार्या काँग्रेसला महाविकास आघाडीतील मित्रपक्षांकडून दिलासा मिळण्याचे संकेत प्राप्त होऊ लागले आहेत. भिवंडीच्या बदल्यात काँग्रेसला सातारा मतदारसंघ सोडण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसने दाखविल्याचे वृत्त असून सातारा मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण निवडणूक रिंगणात उतरणार आहेत.
संबंधित बातम्या
सातारा, सांगली या दोन लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीबाबत सोमवारी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात खलबते झाली. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माजी मुख्यमंत्री व आमदार पृथ्वीराज चव्हाण यांची त्यांच्या कराड येथील निवासस्थानी भेट घेतली. या बैठकीनंतर तपशील सांगण्यास आमदार पाटील यांनी नकार दिला. या बैठकीनंतर सांगलीतून जयंत पाटील, तर सातारा येथून चव्हाण हे लढत असल्याची चर्चा पसरली. दरम्यान, सांगलीवरील दावेदारी सोडण्यास काँग्रेस राजी झाल्याचेही कळते.
राष्ट्रवादी काँग्रेसकडे सातार्याच्या रिंगणात उतरविता येईल, असा तगडा उमेदवार नाही. त्यामुळे या जागेवर काँग्रेसचे चव्हाण यांना उमेदवारी द्यावी, असा प्रस्ताव चर्चेत आला. सातार्यात लढण्यास इच्छुक असलो तरी आपण काँग्रेस सोडून राष्ट्रवादीत जाणार नाही, अशी भूमिका चव्हाण यांनी घेतली. अखेर राष्ट्रवादीने त्यांच्यासाठी ही जागा सोडण्याची तयारी दर्शवली.