१० वर्षांतील विकास हा फक्‍त ट्रेलर : नरेंद्र मोदी  | पुढारी

१० वर्षांतील विकास हा फक्‍त ट्रेलर : नरेंद्र मोदी 

मुंबई : पुढारी वृत्तसेवा :  दहा वर्षांपूर्वी रिझर्व्ह बँकेच्या 80व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला आलो होतो तेव्हा भारतीय बँकिंग क्षेत्र संकटात सापडले होते. अनुत्पादक कर्जांच्या जाळ्यात अडकलेली भारतीय बँकिंग व्यवस्था बुडेल अशी अनेकांना शंका होती. मात्र, आता तीच बँकिंग व्यवस्था जगातील सर्वांत मजबूत आणि शाश्वत व्यवस्था बनली आहे. आमचा हेतू शुद्ध होता. त्यामुळे त्याचे परिणामही आपसूकच चांगले आले. दहा वर्षांतला हा विकास फक्त ट्रेलर आहे. येत्या काळात बँकिंग क्षेत्रात आमूलाग्र बदल करणार असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केले.
संबंधित बातम्या 
भारतीय रिझर्व्ह बँकेला 90 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त नरिमन पॉइंट येथे आयोजित ‘आरबीआय 90’ या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान मोदी बोलत होते. याप्रसंगी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, अर्थ राज्यमंत्री भागवत कराड आणि पंकज चौधरी, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास उपस्थित होते.
पंतप्रधान म्हणाले, भारतीय रिझर्व्ह बँकेने स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर असे दोन्ही कालखंड पाहिले आहेत. तसेच आपली व्यावसायिकता आणि वचनबद्धतेच्या आधारे जगभरात एक खास ओळख निर्माण केली आहे. येथील कर्मचार्‍यांनी आज तयार केलेली धोरणे भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पुढील दशकाला आकार देतील आणि हीच 10 वर्षे भारतीय रिझर्व्ह बँकेला शताब्दी वर्षात घेऊन जातील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
पुढच्या दहा वर्षांत भारताची आत्मनिर्भरता वाढवायची आहे. जागतिक संकटांमुळे आर्थिक क्षेत्रात चढ-उतार होत असतात. मंदीसारखी आव्हाने येतात. त्यामुळे आपल्या अर्थव्यवस्थेवर या जागतिक संकटांचा कमीत कमी परिणाम व्हावा, यासाठी विचार व्हायला हवा, असे मत त्यांनी व्यक्त केले.  त्यासाठी आपण काय काय करू शकतो ते ठरवा. आपण नवीन क्षेत्रांसाठी धोरणे बनवा, असे सांगत मोदी यांनी आरबीआयला भविष्यातील योजनांवर आणि धोरणांवर काम करण्याचे आवाहन केले.
दरम्यान, दहा वर्षांच्या कारभारात आमचा हेतू, धोरण आणि निर्णय हे प्रामाणिक आणि योग्यच राहिले.  जेव्हा हेतू योग्य असतो, तेव्हा आपोआप धोरणही योग्य बनते. जेव्हा धोरण योग्य असते, तेव्हा निर्णय आणि त्याचे परिणामही योग्यच असतात. सरकारने दृढसंकल्पाने कामे केली. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना मदत करण्यासाठी साडेतीन लाख कोटींचे भांडवल उभारले. प्रशासनात, नियमात सुधारणा केल्या, असे मोदी यांनी सांगितले.
90 रुपयांच्या विशेष नाण्याचे अनावरण 
आरबीआयच्या 90 व्या वर्धापन दिनानिमित्त मोदी यांनी 90 रुपयांच्या विशेष नाण्याचेही यावेळी अनावरण केले. या नाण्याचे वजन 40 ग्रॅम असून यामध्ये 99.99 टक्के चांदीचा वापर करण्यात आला आहे. आरबीआयचा समृद्ध वारसा आणि 90 वर्षांतील यशाचे प्रतिबिंब या नाण्यातून व्यक्त करण्यात आले आहे. नाण्यावर ‘सत्यमेव जयते’ असा उल्लेख आहे.
शपथविधीनंतर तुमचा कामाचा लोड वाढणार
मोदी यांनी लोकसभा निवडणुकीत हॅट्ट्रिक करणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त केला. आपण 100 दिवस प्रचारानिमित्त व्यस्त राहणार आहोत. शपथविधीनंतर दुसर्‍याच दिवशी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियावर (आरबीआय) कामाचा बोजा वाढणार आहे, अशी मिश्कील टिपणी करताच सभागृहात हशा पिकला.
जर देशाचे प्राधान्यक्रम स्पष्ट असतील, तर त्याला  प्रगती करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. कोविड महामारीच्या काळात सरकारने सारासार विचार करत सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनाला प्राधान्य दिले. त्यातून गरीब आणि मध्यमवर्ग प्रतिकूल परिस्थितीतून बाहेर पडला.
– नरेंद्र मोदी, पंतप्रधान

Back to top button