नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : द्रमुकचे सदस्य टी. आर. बालू यांनी अविश्वास प्रस्तावावरील चर्चेत सहभाग घेताना महाभारतातील द्रौपदी वस्त्रहरणाचा संदर्भ देत सरकारवर टीका केली होती. बालू यांच्या त्या टीकेला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (FM Sitharaman) यांनी आज (१० ) लोकसभेत प्रत्युत्तर दिले. सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावावरील चर्चेत सहभाग घेताना त्या बोलत होत्या.
यावेळी सीमारामन म्हणाल्या की, २५ मार्च १९८९ रोजी तामिळनाडू विधानसभेत तत्कालीन विरोधी पक्षनेत्या जयललिता यांची साडी खेचण्याचे कृत्य करण्यात आले होते. त्यावेळी द्रमुकचे तमाम आमदार टिंगल करत हसत होते. त्यावेळी जयललिता यांनी मुख्यमंत्री झाल्याशिवाय आपण विधानसभेत पाउल ठेवणार नाही, अशी शपथ घेतली होती. आणि दोन वर्षानंतर मुख्यमंत्री बनूनच त्या विधानसभेत आल्या होत्या. सीतारामन यांनी हा संदर्भ सांगितल्यानंतर द्रमुकचे सदस्य आक्रमक झाले. त्यांच्याबरोबर काँग्रेस व अन्य विरोधी सदस्यांनी सभात्याग केला.
संपुआ सरकारच्या कार्यकाळात लोकांना वेगवेगळी स्वप्ने दाखविली जात होती. दुसरीकडे आम्ही स्वप्न दाखविण्याचे नव्हे तर ते साकार करण्याचे काम केले, निर्मला सीतारामन यांनी सांगितले.
वेगाने विकसित होत असलेल्या देशांत भारताचे नाव आघाडीवर आहे आणि त्याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आहे, असे सांगून त्या म्हणाल्या की, पंतप्रधानांनी देशाचे धोरण बदलले, त्यामुळे कोरोना संकटाला मागे टाकत देश वेगाने घौडदौड करीत आहे. महागाई आणि अन्य कारणांमुळे सारे जग सध्या आर्थिक संकटाचा सामना करीत आहे. अमेरिका, चीनसारख्या अर्थव्यवस्थांवर काळे ढग आहेत. दुसरीकडे भारत जागतिक अर्थव्यवस्थेसाठी आशेचा किरण बनला आहे. संपुआ सरकारच्या काळात लोकांना स्वप्ने दाखविली जात असत. तर आमच्या रालोआच्या काळात लोकांची स्वप्ने साकार केली जात आहेत.
'गरिबी हटावो' चा नारा आपण सहा दशकांपासून ऐकत होतो, पण गरिबी कधी हटविण्यात आली नाही. दुसरीकडे आम्ही लोकांची गरिबी कमी करत आहोत. तुम्ही म्हणायचा हे होणार, ते होणार. पण आम्ही 'झाले' असे म्हणतो. तुम्ही म्हणायचा वीज येणार, गॅस – पाण्याची जोडणी येणार, घरे मिळणार, स्वच्छतागृह बनणार, रस्ते आणि महामार्ग बनणार, बंदर-विमानतळ बनणार, बॅंक खाते उघडणार, एसएमई कर्ज, स्वस्त औषध आणि आरोग्य सुविधा मिळणार. तर आम्ही म्हणतो, हे सगळे लोकांना मिळाले आहे. सत्ताधारी सदस्यांनी घोषणाबाजी करीत व 'झाले' असे म्हणत सीतारामन यांच्या सुरात सूर मिसळला.
वर्ल्ड बँकेच्या अंदाजानुसार चालूवर्षी जागतिक आर्थिक विकासदर २.१ टक्क्यांच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. ब्रिटनमध्ये आव्हानात्मक स्थिती असून बॅंक ऑफ इंग्लंडने १४ वेळा व्याजदर वाढविले आहेत, तेथील व्याजदर आता १५ वर्षाच्या उच्चांकी स्तरावर आहेत. या व अन्य देशांच्या तुलनेत भारताची सि्थती चांगली आहे, असे सीतारामन यांनी सांगितले. २०१३ साली मॉर्गन स्टॅन्ले नावाच्या संस्थेने भारताचा समावेश पाच नाजूक अर्थव्यवस्थांमध्ये केला होता. आज त्याच संस्थेने भारताला भरीव रेटिंग दिलेले आहे, असेही त्या म्हणाल्या.
तत्कालीन संपुआ सरकारच्या काळात बॅंकींग क्षेत्राची अवस्था दयनीय झाली होती. तुम्ही जो रायता पसरविला होता, तो आम्ही स्वच्छ करीत आहोत, असे सांगत अर्थमंत्री म्हणाल्या की, सार्वजनिक क्षेत्रातील बॅंका चांगली कामगिरी करीत असून त्यांचा नफा वाढला आहे. पीएसयू बॅंकांना एक लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त फायदा झाला आहे. यात स्टेट बॅंक इंडियाच्या तिमाहीतील 18 हजार 537 कोटी रुपयांच्या नफ्याचा समावेश आहे. जागतिक अर्थव्यवस्थांमध्ये भारत पाचव्या क्रमांकावर आला आहे. डिजिटल इंडिया मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. विदेशी चलन साठा सहाशे अब्ज डाॅलर्सच्या वर गेला आहे. 2014 साली देशात केवळ 4 युनिकाॅर्न होते, ते वाढून 106 वर गेले आहेत. स्टार्टअपना दिल्या जात असलेल्या प्रोत्साहानाचा हा परिणाम आहे.
अविश्वास प्रस्तावावरील चर्चेत शिवसेनेचे राहुल शेवाळे, भाजपच्या लॉकेट चॅटर्जी, बिजू जनता दलाच्या राजश्री मलिक, लोकजनशक्ती पार्टीचे चिराग पासवान, प्रिन्स राज, काँग्रेसचे हिबी इडेन, राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे, आरएलपीचे हनुमान बेनिवाल, एमआयएचे असदुद्दीन ओवेसी, तृणमूलच्या मोहुआ मोईत्रा यांनी चर्चेत सहभाग घेतला.
हेही वाचा :