Rahul Gandhi speech : सत्ताधारी आणि विरोधकांमधील वाद वाढण्याची शक्यता; राहुल गांधींच्या भाषणातील 'ते' शब्द रेकॉर्डवरून वगळले | पुढारी

Rahul Gandhi speech : सत्ताधारी आणि विरोधकांमधील वाद वाढण्याची शक्यता; राहुल गांधींच्या भाषणातील 'ते' शब्द रेकॉर्डवरून वगळले

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान विरोधकांनी सत्ताधाऱ्यांविरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर चर्चा करताना काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी तुफान फटकेबाजी केली. परंतु, राहुल यांच्या भाषणातील काही शब्द रेकॉर्ड वरून वगळण्यात आल्याची माहिती आता समोर आली आहे. यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमधील वाद वाढण्याची शक्यता आहे. राहुल गांधी यांच्या भाषणा दरम्यान वापरण्यात आलेल्या काही शब्दांवर सत्ताधाऱ्यांनी आक्षेप नोंदवल्या नंतर ‘हत्या’, ‘कत्ल’, ‘देशद्रोही’ या शब्दांसह जवळपास १२ हून अधिक शब्द रेकॉर्डवरून काढून टाकण्यात आल्याचे समजते.
बुधवारी जवळपास १२ वाजून १० मिनिटांनी राहुल यांनी त्यांचे भाषण सुरु केले.पाच मिनिटांनंतर त्यांनी या शब्दांचा वापर केला. दरम्यान लोकसभा सचिवालयाने संबंधित शब्द संसदीय परंपरेला अनुकूल नसल्याचा ठपका ठेवत त्यांना भाषणाच्या रेकॉर्ड वरून हटवण्याचा निर्णय घेतला.
भाषणा दरम्यान राहुल गांधी यांनी मणिपूर मधील स्थितीसंबंधी केंद्र सरकारवर घणाघात केला. ईशान्य भारतातील या राज्यात भारत मातेची हत्या करण्यात आली आणि असे करणारे लोक देशद्रोही आहेत, अशा शब्दात राहुल यांनी मोदी सरकारला धारेवर धरले होते.

Back to top button