Fitness Routine : …वाचा शरीरासोबत मनाचाही फिटनेस कसा राखायचा?

Fitness Routine
Fitness Routine

फिटनेस कसा राखायचा? डॉ. मनोज शिंगाडे

मन आणि शरीर एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. शारीरिक विकारांचा जसा मनःस्वास्थ्यावर परिणाम होतो तसाच मानसिक अस्वस्थतेचा शरीरावर परिणाम होत असतो. म्हणूनच मन आणि शरीराचे आरोग्य एकाच वेळी बघणे गरजेचे ठरते. (Fitness Routine )

आरोग्य उत्तम असणे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक सुस्थिती असणे होय. आरोग्य म्हणजे केवळ शारीरिक तंदुरुस्ती नव्हे. काळानुसार आरोग्यदायी व्याख्याही विस्तृत होत गेली. अलीकडे शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच भावनिक, व्यावसायिक आध्यात्मिक, " सांस्कृतिक अशा कितीतरी बाजूंनी आरोग्याचा विचार केला जातो. फिटनेस हा शब्द वापरला जातो, तेव्हा त्यात शरीर आणि मन दोन्हींचे आरोग्य समाविष्ट असते. शेवटी मन आणि शरीर एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. शारीरिक विकारांचा जसा मनःस्वास्थ्यावर परिणाम होतो तसाच मानसिक अस्वस्थतेचा शरीरावर परिणाम होत असतो. म्हणूनच मन आणि शरीराचे आरोग्य एकाच वेळी बघणे गरजेचे ठरते.
फिटनेस म्हणजे नेमके काय? शरीर सुदृढ असणे आणि मन निरामय असणे आवश्यक आहे. आरोग्य अर्थात सुदृढ शरीर असे आपण म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ शक्ती असा लावला जातो.

Fitness Routine :  योग्य व्यायाम सराव आणि योग्य आहार

शक्तीच्या अर्थातच मर्यादा असतात. प्रत्येक सर्वसामान्य माणसात एखाद्या कुस्तीगीराइतकी शक्ती असणे अपेक्षित नाही, पण तरीही त्याकडे किती शक्ती असावी याचे काही वैद्यकीय परिमाण आहेत. उदाहरणार्थ, दिवसभराचे काम करताना थकवा येता कामा नये. साधारणपणे ५० ते ७० किलो वजनाच्या मध्यम वयाच्या व्यक्तीला ५ किलो वजन उचलता आले पाहिजे. आजारपण वगळता साधारणपणे १३ १४ मिनिटांत एक किलोमीटर चालता आले पाहिजे. रोज चालणे गरजेचे आहे, असे डॉक्टर वारंवार सांगतात ते याचसाठी. स्नायूंची शक्ती ही एखाद्या यंत्राप्रमाणे असते. म्हणजे यंत्र नियमित वापरले तर ते उत्तम प्रकारे काम करते. त्यामुळे ते गंजत नाही. तसेच स्नायूंचे असते. योग्य व्यायाम सराव आणि सोबत योग्य आहार यामुळे स्नायू तंदुरुस्त राहतात. अशी शक्ती लाभण्यासाठी वजन उचलणे, जोर, बैठका, जीममधील विविध उपकरणांद्वारे व्यायाम योगासने इत्यादीपैकी काहीही करता येते. शक्ती सोबत चपळाई देखील खूप महत्त्वाची असते. सांधे, स्नायू, आंतरत्वचा यातील लवचिकपणा टिकणे महत्त्वाचे असते. नेमक्या वेळी काय करावे हे समजले पाहिजे. तोल सांभाळता आला पाहिजे.त्यासाठी योगासने खूप चांगला उपाय आहे. मैदानी खेळ देखील यासाठी चांगला उपाय आहे.

Fitness Routine : आजारांवर नियंत्रण

कोणतेही काम दम न लागता दीर्घकाळ करता येणे हे देखील फिटनेससाठी महत्त्वाचे लक्षण आहे. यासाठी काही उपाय करता येतील. संथगतीने पण दीर्घकाळ एखादी शारीरिक क्रिया करत राहणे, संथपणे बराच काळ चालत राहणे, पोहणे, सायकल चालवणे असे व्यायाम खूप उपयुक्त ठरतात. यामुळे स्नायूंची प्राणवायू घेण्याची क्षमता वाढते. याचा परिणाम म्हणजे स्नायू दीर्घकाळ कार्यरत राहू शकतात. प्राणवायू आणि ग्लुकोजच्या रेणूंचा वापर करत स्नायू काम करत असतात. त्यामुळे शरीरातील चयापचय सुधारते. परिणामी मधुमेह, स्थूलपणा उच्चरक्तदाब यासारख्या आजारांवर नियंत्रण मिळवणे शक्य होते.

फिटनेस म्हणजे मन आणि शरीर यांची एकत्रित अशी उत्तम स्थिती

स्नायू शक्तिशाली, चपळ होण्यासाठी त्याला इंधन आवश्यक असते. हे इंधन प्राणवायू आणि ग्लुकोजच्या रूपात मिळणे गरजेचे असते. हा पुरवठा सतत होण्यासाठी हृदय आणि फुफ्फुसांचे कार्य आणि चयापचयाची स्थिती उत्तम असावी लागते. हृदयाचे, फुफ्फुसांचे आजार टाळण्यासाठी आणि त्याची कार्यक्षमता उत्तम राहण्यासाठी काहीविशिष्ट व्यायाम उपायुक्त ठरतात. चलपद्धतीचे व्यायाम म्हणजे ज्यामध्ये स्नायूंची लांबी कमी होत असते, त्यामुळे सांधे हलतात. यात धावणे, सायकल चालवणे, पोहणे, भराभर चालणे, दोरीवरच्या उड्या, अॅरोबिक पद्धतीचे व्यायाम इत्यादी प्रकार उपयुक्त ठरतात. त्यामुळे नाडीची गती वाढू लागते, पण ही गती किती असणे योग्य असते हे जाणून घेण्यासाठी एका सोप्या पद्धतीचा अवलंब करावा.

२२० या संख्येतून आपले वय वजा करावे. येणाऱ्या संख्येच्या दोन तृतीयांश एवढी नाडीची गती दर मिनिटाला असली म्हणजे चल पद्धतीचा व्यायाम योग्य प्रकारे झाला असे म्हणायला हरकत नाही. सुरुवातीला एका वेळेस केवळ १० ते १५ मिनिटे आणि आठवड्यातून तीनदा हा व्यायाम करावा. तंदुरुस्ती वाढल्यानंतर अर्धा तासापर्यंत हळूहळू वेळ वाढवावी. थोडक्यात फिटनेस म्हणजे मन आणि शरीर यांची एकत्रित अशी उत्तम स्थिती आहे. सशक्त, चपळ, लवचिक शरीर, निर्णय घेण्याची क्षमता, दीर्घकाळ श्रम करता येणे या गोष्टी फिटनेसमध्ये समाविष्ट होतात. व्यायामासोबत योग्य आहार आणि प्रसन्न मनःस्थिती देखील फिटनेससाठी गरजेची आहे.

हेहा वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news