पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय महिला क्रिकेट संघाने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा 16 धावांनी पराभव करत मालिका 3-0 ने क्लीन स्वीप केली. मात्र, भारताच्या विजयापेक्षा फिरकीपटू दीप्ती शर्माने इंग्लंडचा खेळाडू चार्ली डीनला मंकडिंग पध्दतीने धावबाद केल्याची अधिक चर्चा झाली. चेंडू टाकण्यापूर्वी डीनने क्रीज सोडले होते. त्यामुळे दीप्तीने तिला मंकडिंग पध्दतीने धावबाद केले. (Mankading)
दीप्तीने मंकडिंग धावबाद हे नियमानुसार केले आहे, असे म्हणत काहींनी तिचे समर्थन केले आहे. तर हे क्रिकेटच्या विरूध्द असल्याच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. दीप्ती-डीन वादात भारतीय संघाचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विनही सोशल मीडियावर दीप्तीचे समर्थन केले आहे. कालच्या घटनेवर अश्विन का ट्रेंड करत आहे? आजची रात्र आणखी एका बॉलिंग हिरोबद्दल आहे. असे लिहून त्याने दीप्तीचे समर्थन केले आहे. अश्विनने अशाच प्रकारे आयपीएल 2019 मध्ये इंग्लंडच्या जोस बटलरला मंकडिंगने धावबाद केले होते. त्यावेळी लोकांनी अश्विनचे मीम्स आणि फोटो शेअर करून त्याच्यावर टीका केली होती.
1947 मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेतील एका सामन्यात भारताच्या विनू मंकड यांनी गोलंदाजीपूर्वी क्रीज सोडून पुढे गेलेल्या बिल ब्राऊनला रन आऊट केले. तेव्हापासून अशा पद्धतीने फलंदाजाला आऊट केल्यास मंकडिंग असे संबोधले गेले. यावेळी यावर ऑस्ट्रेलियात मोठी टीकाही झाली होती. अशा प्रकारे फलंदाजास आऊट करणे खिळाडूवृती नाही, असे म्हटलं गेले हाेते.
मंकडिंग ( नॉन स्ट्राइकवर असलेल्या फलंदाजाने गोलंदाजाने चेंडू टाकण्यापूर्वीच क्रिज सोडली तर गोलंदाज संबंधित फलंदाजाला धावचीत करतो ) पद्धतीने गोलंदाज फलंदाजाला बाद करु शकतो, मात्र यामध्ये तो अपयशी ठरल्यास हा चेंडू 'डेड बॉल ' मानला जाईल, असे नवीन नियमात स्पष्ट करण्यात आले आहे. यापूर्वी क्रिकेटमधील नियम 41 नुसार अशा प्रकारे फलंदाजास बाद करणे खिळाडूवृतीविरोधात असल्याचे मानले जात होते. मात्र आता नियम 38 नुसार अशा प्रकारे बाद करणे धावचीत मानले जाणार आहे.
हेही वाचा;