Sai Pallavi : साई पल्लवीविरोधात गुन्हा दाखल

sai pallavi
sai pallavi

पुढारी ऑनलाईन डेस्क : काश्मिरी पंडित आणि लिचिंगवरून तथाकथित केलेल्या वक्तव्यामुळे दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी अडचणीत आली आहे. तिच्या वक्तव्याचा निषेध करत बजरंग दलाने तिने माफी मागावी, अशी मागणी केलीय. दरम्यान, तिच्याविरोधात हैदराबादमध्ये पोलिस तक्रार करण्यात आली असून एफआयआर दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आलीय.

साई काय म्हणाली होती?

साई पल्लवीने एका युट्यूब चॅनेला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, काश्मिरी पंडितांवर अन्याय करणारे आणि मॉब लिंचिंग करणारे सारखेच वाटतात. तेव्हा जे घडलं त्यात आणि मॉब लिचिंगच्या घटनांच्या वेळी जे घडलं त्यात काय फरक आहे?, तिला तिच्या विचारसरणी बद्दल विचारले असता ती म्हणाली, " मला मी लहान असल्यापासून शिकवण्यात आले आहे की, चांगली व्यक्ती हो, त्यामुळे मी तटस्थ राहण्याला पसंती देते.  जर का तुम्ही डाव्या किंवा उजव्या विचारसरणीचे असाल आणि जर का तुम्ही व्यक्ती म्हणून चांगले नसाल तर न्याय कुठेच नसेल. पण व्यक्ती म्हणून तुम्ही चांगले असाल तर तटस्थ म्हणून विचार करू शकता."

या विधानानंतर सोशल मीडियावर साईवर टिकेची झोड उडाली. काही जणांकडून संमिश्र प्रतिक्रिया आल्या. तर काही जणांनी तिच्या धाडसाचं कौतुक केलं होतं.

बजरंग दलाच्या निशाण्य़ावर साई

साईच्या या विधानानंतर बजरंग दल भाग्यनगरच्या वतीने हैदराबादमध्ये तिच्याविरोधात केस दाखल करण्यात आलीय. दलाने आपल्या ट्विटर हँडलवर तक्रार पत्र शेअर करत लिहिले आहे की, "बजरंगदल विद्यानगर जिल्हा संयोजक अखिल सिंडोले जी आणि बालोपासना केंद्र प्रमुख अभिषेक कुर्माने सुल्तान बाजार पीएसमध्ये साईविरोधात केस दाखल केली." अपमानजनक वक्तव्यासाठी अभिनेत्री साई पल्लवीने संपूर्ण देश, विशेषत: काश्मिरी हिंदुंची माफी मागावी. जर असे झाले नाही तर परिस्थिती आणखी बिघडू शकते.
आता साईकडून कोणती प्रतिक्रिया येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

या चित्रपटात दिसणार अभिनेत्री साई

साई पल्लवी सध्या दाक्षिणात्य अभिनेता राणा दग्गुबतीसोबत 'विराट पर्वम' या नवीन चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. चित्रपटात अभिनेत्री तेलंगणातील एका नक्षलवादी नेत्याच्या प्रेमात पडते. या नक्षलवादी नेत्याची भूमिका राणाने साकारली आहे. या दोन स्टार्ससोबत या चित्रपटात नंदिता दास, प्रियामणी, ईश्वरी राव, निवेथा पेथुराज, राहुल रामकृष्ण आणि नवीन चंद्र यांच्याही मुख्य भूमिका आहेत. हा चित्रपट सत्य घटनांवर आधारित आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news