कोपरगाव: वीज मोटार चोरट्याची ग्रामस्थांकडून धुलाई | पुढारी

कोपरगाव: वीज मोटार चोरट्याची ग्रामस्थांकडून धुलाई

चांदेकसारे : कोपरगाव तालुक्यातील देर्डे-कोर्‍हाळे परिसरात शेतकर्‍यांच्या विद्युत मोटारी स्टार्टर व केबल चोरीचे प्रमाण वाढल्याने रात्री शेतकर्‍यांनी गस्त सुरु केली. या परिसरात अनिल देशमुख यांच्या विहिरीतून विद्युत मोटार काढताना काही शेतकर्‍यांनी चोरांना बघितले. रात्री 11 वाजता शेतकर्‍यांनी एका चोरट्याला पकडून येथेच्छ चोप दिला, मात्र दबा धरून बसलेले त्याचे अन्य साथीदार पळून जाण्यात यशस्वी ठरले.

हिंगणीचे पोलिस पाटील पंडित पवार व धनराज पवार यांनी तालुका पोलिस स्टेशनला यासंदर्भात खबर दिली. देशमुख यांच्या विहिरीतून विद्युत मोटार चोरी होत असताना आजूबाजूच्या शेतकर्‍यांनी गावात फोन करून यासंदर्भात माहिती दिली. कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संचालक अरुणराव येवले, सरपंच योगिराज देशमुख ,उपसरपंच अनिल डुबे, माजी सरपंच राजेंद्र डूबे, विजय डुबे ,संजय डुबे आदींसह गावातील 100 शेतकर्‍यांचा ग्रुप घटनास्थळी दाखल झाला. पकडलेल्या चोरट्याची यथेच्छ धुलाई करत त्याच्याकडून आणखी साथीदारांची नावे जाणून घेतली. मध्यरात्री पो. नि. दौलतराव जाधव व पो. उ. नि. सुरेश आव्हाड फौजफाट्यासह घटनास्थळी आले. चोरट्याला ताब्यात घेऊन ते परतले.

Back to top button