रेल्वेकडून मृतांच्या कुटुंबीयांना मिळतात 10 लाख रुपये

रेल्वेकडून मृतांच्या कुटुंबीयांना मिळतात 10 लाख रुपये

प्रसाद जगताप

पुणे : रेल्वेतून प्रवास करताना अपघातामध्ये प्रवाशाला जीव गमवावा लागल्यास मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपयांची आर्थिक मदत रेल्वेकडून केली जाते. ही मदत फक्त आरक्षित तिकीट असलेल्या आयआरसीटीसीकडून (इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन) या आर्थिक मदतीसाठी विमा योजनेचे नियोजन करण्यात येते. प्रत्येक प्रवाशाकडून तिकिटामागे 35 पैशांची आकारणी या विम्याकरिता रेल्वे प्रशासनाकडून केली जाते. प्रवासादरम्यान अपघात झाल्यास आणि त्यामध्ये प्रवाशाचा मृत्यू झाल्यास, त्या प्रवाशाच्या कुटुंबीयांना 10 लाखांच्या विम्याची मदत होते. त्यामुळे अपघाग्रस्तांच्या कुटुंबीयांना दिलासा मिळतो.

…अशी मिळते आर्थिक मदत

  • प्रत्येक तिकिटामागे 35 पैसे विम्यासाठी आकारणी
  • कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास साडेसात लाख रुपयांची मदत
  • गंभीर दुखापतीसाठी रुग्णालय खर्च 2 लाख मदत
  • मृत देहाच्या वाहतुकीसाठी 10 हजार रुपये रेल्वेची मदत तर मृत कुटुंबीयांना 10 लाख रुपये मदत

आयआरसीटीसीच्या माध्यमातून काढण्यात येणार्‍या विमा रकमेतून रेल्वे प्रशासन अपघाती मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपये मदत करते. रेल्वे तिकीट केंद्रावर काढलेल्या आणि आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावरून काढलेल्या आरक्षित तिकीटधारकांनाच ही मदत मिळते.

– डॉ. मिलिंद हिरवे, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, रेल्वे,
पुणे विभाग

रेल्वेची रोज अडीच कोटी आरक्षित आणि तत्काळ तिकिटे खपतात. त्या प्रत्येक तिकिटामागे 35 पैशांची विम्यासाठी आकारणी केली जाते. प्रचंड पैसा कंपनीला मिळतो. सुदैवाने रोज अपघात होत नाहीत. रेल्वेने स्वत:ची विमा कंपनी काढावी. 35 पैशांऐवजी 2 रुपयांची विम्यासाठी आकारणी करावी आणि मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना 50 लाखांची मदत करावी, तर जखमींना 30 लाखांची मदत करावी.

– हर्षा शहा,
अध्यक्षा, रेल्वे प्रवासी ग्रुप

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news