अकोला; पुढारी वृत्तसेवा : curfew : शहरात कायदा सुव्यवस्था कायम राहावी या अनुषंगाने जमावबंदी तथा संचारबंदी उपविभागीय अधिकारी डॉ. नीलेश अपार यांच्या आदेशाने लागू झाला आहे. त्यानुसार, 17 नोव्हेंबरच्या दुपारी 12 वाजेपासून 19 नोव्हेंबरच्या सकाळी 6 वाजेपर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अंतर्गत जमावबंदी तथा संचारबंदी आदेश लागू केला आहे. सकाळी 6 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत जमावबंदी आणि 7 वाजेपासून सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी राहणार आहे.
त्या अनुसार सार्वजनिक स्थळी चार आणि त्याहून अधिक व्यक्तिंना एकत्र येण्यास मनाई राहील. विधान परिषद निवडणुकी संदर्भात नाम निर्देशन पत्र दाखल करण्यासाठी सुट राहणार आहे. कर्फ्यू काळात वैद्यकीय सेवा सुरू राहतील. तसेच अत्यावश्यक सेवा देखील सुरू राहतील. या आदेशाचे पालन करण्याची गरज आहे. जे आदेशाचे पालन करणार नाहीत त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल.
त्रिपुरा घटनेच्या पार्श्वभूमिवर कायदा व सुव्यवस्थेची पाहणी करण्यासाठी बुधवारी विशेष पोलिस महानिरीक्षक चंद्रकिशोर मिणा अकोल्यात आले होते. त्यांनी पोलिस अधिका-यांना शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्याचे निर्देश दिले. यावेळी पोलिस अधीक्षक जी.श्रीधर यांच्यासह महत्वाचे अधिकारी उपस्थित होते. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त लावण्यात आला. हिंगोली व अमरावती राज्य राखील दलाच्या तुकड्या बोलाविल्या असून वाशिम येथील पोलिस दलाला पाचारण केल्याची माहिती प्राप्त झाली आहे.