सावधान.! दारुचा रोजचा ‘एकच प्‍याला’ही ठरतो आरोग्‍यासाठी घातक, जाणून घ्‍या संशोधन काय सांगते?

संग्रहित छायाचित्र.
संग्रहित छायाचित्र.

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : दररोज कमी (मद्यपान) दारुचे सेवन करणे आरोग्‍याला पोषक असते, असा मोठा गैरसमज सर्वसामान्‍यांमध्‍ये आहे. आजवर अनेक वैद्यकीय संशोधनामध्‍ये दारुचे आरोग्‍यावर होणारे गंभीर परिणामावर प्रकाशझोत टाकण्‍यात आला आहे. आता अमेरिकन हार्ट असोसिएशनने सात अभ्‍यासांच्‍या डेटाचे केलेल्‍या विश्‍लेषणात दररोज एक ग्‍लास मद्यपान देखील उच्च रक्तदाबाशी संबंधित असल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे. ( Alcohol and Blood pressure )

Alcohol and Blood pressure : उच्‍च रक्‍तदाबचा धोका

अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या 'हायपरटेन्शन' जर्नलमध्ये सोमवारी ( ३१ जुलै) प्रकाशित झालेल्या संशोधनात सात आंतरराष्ट्रीय अभ्यासांमधील डेटाचे विश्लेषण केले गेले आहे. यामध्‍ये असे आढळून आले की, जे लोक दररोज एक पेग दारु पितात त्यांना दारु न पिणार्‍यांच्‍या तुलनेत उच्च रक्तदाब होण्याची धोका अधिक असतो. .

विश्लेषणामध्ये  अमेरिका, दक्षिण कोरिया आणि जपानमधील १९ हजारांहून अधिक प्रौढांच्या डेटाचा समावेश आहे. अल्कोहोलचा वापर पेयांच्या संख्येवर नव्हे तर सेवन केलेल्या ग्रॅम अल्कोहोलवर आधारित होता. पाच वर्षांहून अधिक काळ सर्व सहभागींच्या डेटाचे पुनरावलोकन केल्यानंतर, संशोधकांना कमी पण नियमित दारु पिणार्‍यांचा रक्तदाबाचा विकार झाल्‍याचे आढळले.

Alcohol and Blood pressure : अल्‍कहोल पूर्णपणे टाळणे अधिक चांगले

यासंदर्भात इटलीतील मोडेना आणि रेजिओ एमिलिया विद्यापीठातील वरिष्ठ संशोधक डॉ. मार्को विन्सेटी सांगतात की, " मद्यपान न करणाऱ्यांच्या तुलनेत कमी प्रमाणात मद्यपान करणाऱ्या प्रौढांमध्ये आम्हाला कोणतेही फायदेशीर परिणाम आढळले नाहीत. संशोधन विश्‍लेषणात असे आढळले की, अल्कोहोलचा नकारात्मक प्रभाव वर्षानुवर्षे रक्तदाब वाढवणे सुरूच ठेवतो. दररोज एकच पेग घेणार्‍या पुरुष आणि स्त्रियांचा रक्‍तदाब वाढल्‍याचे आढळले. त्‍यामुळे अल्कोहोलचे सेवन मर्यादित करण्याचा सल्ला दिला जातो त्‍यापेक्षा ते पूर्णपणे टाळणे अधिक चांगले आहे, असेही ते स्‍पष्‍ट करतात.

उच्च रक्तदाब हा 'सायलेंट किलर' म्हणून ओळखला जातो. एखाद्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक, मूत्रपिंडाचा तीव्र आजार आणि इतर गंभीर परिस्थितींचा धोका वाढण्‍याची शक्‍यता असते.

हेही  वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news