England vs India Women’s ODI Series | हरमनप्रीतचा चौकार, षटकारांचा पाऊस, २३ वर्षानंतर भारताने इंग्लंडमध्ये जिंकली एकदिवसीय मालिका

England vs India Women’s ODI Series | हरमनप्रीतचा चौकार, षटकारांचा पाऊस, २३ वर्षानंतर भारताने इंग्लंडमध्ये जिंकली एकदिवसीय मालिका
Published on
Updated on

केंटबरी; वृत्तसंस्था : हरमनप्रीत कौरच्या नाबाद वादळी शतकाच्या जोरावर भारतीय महिला संघाने इंग्लंडचा दुसरा एकदिवसीय सामन्यात 88 धावांनी पराभव केला (England vs India Women's ODI Series) . या विजयामुळे भारतीय महिला संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली आहे. भारतीय संघाने तब्बल 23 वर्षांनी इंग्लंडमध्ये मालिका जिंकण्याची कामगिरी केली आहे. हरमनप्रीत कौरने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडताना नाबाद वादळी शतक झळकावले. तिने अवघ्या 111 चेंडूंत 18 चौकार व 4 षटकारांसह नाबाद 143 धावा काढतानाच हरलिन देओल (58) हिच्यासोबत चौथ्या विकेटसाठी केलेल्या 113 धावांच्या भागीदारीच्या बळावर भारताने दुसर्‍या वन-डे सामन्यात यजमान इंग्लंडसमोर विजयासाठी 334 धावांचे तगडे टार्गेट ठेवले होते. पण इंग्लंडला हे मोठे टार्गेट गाठता आले नाही. इंग्लंडचा संपूर्ण संघ 44.2 षटकांत 245 धावा करु शकला. इंग्लंडच्या डॅनियल वॅटने 65 धावांची खेळी केली. तर भारताच्या रेणुका सिंगने चार बळी घेतले.

इंग्लंडने नाणेफक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्यास पाचारण केले. भारतीय संघाने निर्धारित 50 षटकांत 5 बाद 333 अशी भक्कम स्थिती प्राप्त केली. मानधना व शेफाली वर्मा यांनी संघाच्या डावास सुरुवात केली. पण क्रॉसने भारताला पहिला धक्का देताना शेफालीला (8) त्रिफळाबाद केले. त्यानंतर मानधनाने यासिका भाटियाला सोबत घेऊन डावास आकार दिला, पण यासिकाला (26) डिनने आपल्याच गोलंदाजीवर झेलबाद केले. दरम्यान, मानधनाही (40) इक्लेस्टोनच्या गोलंदाजीवर बाद झाली. यामुळे भारताची 3 बाद 99 अशी स्थिती झाली.

त्यानंतर कर्णधार हरमनने हरलिन देओलला सोबत घेत कोणताही धोका न पत्करता संथ फलंदाजी करत धावसंख्या हळूहळू हलती ठेवली. या जोडीने 59 चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. हरमनने आपल्या 50 धावा 64 चेंडूंत 4 चौकार व एक षटकाराच्या मदतीने पूर्ण केल्या. या जोडीने शतकी भागीदारी 117 चेंडूंत पूर्ण करून भारताला मजबूत स्थिती प्राप्त करून दिली. हरलिनने आपले अर्धशतक 67 चेंडूंत पाच चौकार एक षटकाराच्या मदतीने पूर्ण केले. 40 व्या षटकात बेलने वॅटकरवी हरलिनला झेलबाद करून ही जोडी फोडली. हरलिनने 58 धावांचे योगदान देताना हरमनसोबत चौथ्या विकेटसाठी 125 चेंडूंत 113 धावांची भागीदारी साकारली.

हरलिन बाद झाल्यानंतर हरमनने आक्रमक फटकेबाजीस सुरुवात केली. भारताच्या 250 धावा 45 व्या षटकात पूर्ण झाल्या. हरमनने आपले शानदार शतक 12 चौकार आणि एक षटकाराच्या मदतीने 100 चेंडूंत पूर्ण केले. दरम्यान, पूजा वस्त्राकार 18 धावा काढून बाद झाली. त्यानंतर हरमनला दीप्ती शर्माने शेवटच्या हाणामारीच्या षटकांत चांगली साथ दिली. 48.2 षटकात भारताचे त्रिशतक पूर्ण झाले. शेवटच्या चार षटकात हरमन व दीप्ती या जोडीने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडत 71 धावांचा पाऊस पाडला. शेवटी हरमनप्रीत 111 चेंडूंत 18 चौकार व 4 षटकारांच्या मदतीने 143 धावांवर नाबाद राहिली. तर दीप्ती शर्मानेही 2 चौकारांसह झटपट नाबाद 15 धावा काढल्या. भारताने 50 षटकांत 5 बाद 333 धावांचा डोंगर उभा केला. इंग्लंडच्या वतीने बेल, क्रॉस, केम्प, डीन, इक्लेस्टोन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. (England vs India Women's ODI Series)

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news