पुढारी ऑनलाईन डेस्क :पंजाब विधानसभा निवडणुकीत नामुष्कीजनक पराभवानंतर काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. वाळू उत्खननप्रकरणी माजी मुख्यमंत्री चरणजीत चन्नी हे आता सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) रडारवर असून त्यांना १६ एप्रिल रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
अवैध वाळू उत्खनन आणि अधिकार्यांच्या बदली व नियुक्तीसाठी कोट्यवधी रुपये घेतल्याचा चन्नी यांच्यावर आरोप आहे. याप्रकणी त्यांचा मेहुणीचा मुलगा भूपिंदर सिंह उर्फ हनी याला २० एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. सध्या तो कपूरथला कारागृहात आहे. ईडीने हनी व त्याच्या साथीदारांविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. अवैध वाळू उत्खनन प्रकरणी ४ फेब्रुवारी रोजी हनी याला अटक करण्यात आली होती. हनी व त्याच्या साथीदारांवर बनावट कंपन्यांच्या माध्यमातून मनी लॉन्ड्रिंग केल्याचा आरोप आहे.
१८ ते १९ जानेवारी रोजीच ईडीने टाकलेल्या छाप्यात हनीच्या घरातून ७ कोटी ९० लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली होती. तर हनी याचा साथीदार संदीप कुमार यांच्या घरातून दोन कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली होती. २०१८ मध्ये अमरिदंर सिंग पंजाबचे मुख्यमंत्री होते. यावेळी अवैध वाळू उत्खननचे प्रकरण समोर आले होते. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी कुदरतदीप सिंह याच्यासह संदीप सिंह आणि भूपिंदर सिंग यांनी बोगस कंपन्या तयार केल्या. याप्रकरणी ईडीने चंदीगड, लुधियाना, मोहाली, फतेहगडसह दहांठिकाणी छापे टाकत तब्बल १० कोटी ७० लाख रुपयांची रोकड जप्त केली होती.
हेही वाचा :