नाशिक : पुढारी वृत्तसेवा- मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्तासोबत केलेल्या पार्टीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. मात्र चौकशीत ते अपेक्षित उत्तरे देत नसल्याने पोलिसांनी समांतर तपासास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून जो व्हिडिओ समोर आला आहे, त्याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न पोलिस करीत आहेत. दरम्यान, कायदेशीर सल्ला घेत वकिलांमार्फत प्रश्नांची उत्तरे देण्याची विनंती बडगुजर यांनी पोलिसांकडे केली आहे. त्यानुसार बुधवारी (दि. २०) बडगुजर हे वकिलांसोबत चौकशीस हजर राहणार आहेत.
सलीम कुत्तासोबतच्या पार्टीतील व्हिडिओ, फोटो प्रसिद्धिझोतात आल्यानंतर बडगुजर यांच्यासमोरील अडचणींत वाढ झाली आहे. त्यांची या प्रकरणी चौकशी सुरू असून, पार्टी कुठे, कोणी व कशासाठी आयोजित केली होती. त्यात एकत्र येण्याचा हेतू काय होता, पार्टीत कोण-कोण सहभागी होते. या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे पोलिस शोधत आहेत. सोमवारी (दि. १८) प्रकृती बरी नसल्याचे कारण देत बडगुजर चौकशीस गैरहजर होते. मंगळवारी (दि. १९) सायंकाळी 5.45 वाजता बडगुजर गुन्हे शाखेच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले. दीड तास पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त प्रशांत बच्छाव, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय ढमाळ यांनी बडगुजर यांना व्हिडिओसंदर्भात सुमारे ७० प्रश्न विचारले. मात्र, बडगुजर यांनी कोणतीही ठोस माहिती दिली नाही. त्यामुळे तपासाच्या पाचव्या दिवशीही महत्त्वाचे प्रश्न अनुत्तरित राहिले. त्यामुळे पोलिसांनी पार्टीच्या व्हिडिओवर लक्ष केंद्रित केले असून, व्हिडिओत दिसणाऱ्या सुमारे १४ जणांची चौकशी पोलिसांनी केली आहे. तसेच व्हिडिओच्या तांत्रिक तपासावर पोलिस भर देत आहेत.
हेही वाचा