एकवीरा देवी रोप वे प्रकल्प मंजुरीसाठी शासनाकडे

एकवीरा देवी रोप वे प्रकल्प मंजुरीसाठी शासनाकडे

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  एकवीरा देवी (कार्ला) गडावर जाण्यासाठी प्रस्तावित असलेला रोप वे प्रकल्पाचा अहवाल राज्य रस्ते विकास महामंडळाने मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठविला आहे. शासन स्तरावर सध्या तो प्रलंबित असून लवकरच त्यास मान्यता मिळेल, अशी माहिती 'एमएसआरडीसी'च्यावतीने दिली आहे. राज्यातील प्राचीन मंदिरे, शिल्प व लेणी यांचे जतन संवर्धन करण्यासाठी राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने एमएसआरडीसी निवड केली आहे. प्राचीन मंदिरे, लेणी आणि शिल्पांच्या संवर्धनातून त्यांना आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त करून देण्यासाठी 39 कोटी 43 लाख रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यामध्ये एकवीरा देवीच्या मंदिराचाही समावेश आहे.

एकवीरा देवीचे मंदिर हे सह्याद्री पर्वताच्या कुशीतील कार्ला येथील डोंगरावर आहे, त्यामुळे पायथ्यापासून मंदिरापर्यंत जाण्यासाठी काही पायर्‍या चढाव्या लागतात. देवीचे मंदिर डोंगरात असून, परिसरात लेणी आहेत. त्यामुळे येथे नेहमीच पर्यटकांची गर्दी असते. या देवीच्या मंदिरात दर्शनासाठी येणार्‍या भाविकांसाठी रोप वे तयार करण्यासाठी राज्य पर्यटन विभाग आणि इंडियन पोर्ट रेल आणि रोप वे कॉर्पोरेशन लिमिटेड (आयपीआरसीएल) यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला होता.

हा प्रकल्प 'बांधा, वापरा, हस्तांतरित करा' (बिल्ड ऑपरेट ट्रान्सफर मॉडेल) या तत्त्वावर सुरू करण्यात येणार होता. मात्र, हा प्रकल्प एमएसआरडीसीच्या अधिपत्याखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीकडे देण्यात आला. राज्य शासनाकडून मंजुरी प्राप्त होताच प्रत्यक्ष निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरुवात करण्यात येणार आहे, अशी माहिती एमएसआरडीसीचे अधीक्षक अभियंता राहुल वसईकर
यांनी दिली.

एकवीरा देवी मंदिरात दरवर्षी 7 ते 8 लाख पर्यटक येतात.

मंदिर डोंगरावर असल्याने पायर्‍या चढून गडावर जावे लागते.
रोप-वे झाल्यास दर तासाला सुमारे 1 हजार 440 नागरिक गडावर पोहोचणार अवघ्या तीन मिनिटांत.

या प्रकल्पासाठी सुमारे 36 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

हा प्रकल्प सुमारे 120 मीटर उंचीवर असून, लांबी सुमारे 290 मीटर इतकी असणार आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news