एकनाथ शिंदे : रिक्षा चालक ते मुख्यमंत्री…

एकनाथ शिंदे : रिक्षा चालक ते मुख्यमंत्री…
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : एकनाथ शिंदे…गेली दहा दिवस राज्‍यासह देशभरात गाजत असणारे नावं…निमित्त होतं त्‍यांच्‍या शिवसेनेतील बंडखोरीचे. एकेकाळी "आवाज कोणाचा… शिवसेनेचा" अशी आरोळी ठोकणार्‍या आवाजाने आज मुख्‍यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि गेली 10 दिवस राज्‍याने अनुभवलेल्‍या सत्तेच्‍या महानाट्यावर पडदा पडला. जाणून घेवूया रिक्षाचालक, एक कट्‍ट्‍र शिवसैनिक ते मुख्‍यमंत्री असा एकनाथ शिंदे यांचा राजकीय प्रवास…

शिवसेनेचे मोठे नेते आणि ठाकरे सरकारमध्ये नगरविकास मंत्री असणारे एकनाथ संभाजी शिंदे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय भूकंप घडवून आणला. शिंदे यांनी थेट पक्ष नेतृत्वावरच नाराजी व्यक्त करत पक्षातील इतर काही आमदारांसोबत सूरत गाठले तेथून आसाम मधील गुवाहटीला जात महाविकास आघाडी सरकारच अडचणीत आणले. यानंतर अल्पमतात आलेल्या ठाकरे सरकारला पायउतार व्हावे लागले आणि खऱ्या अर्थाने बाळासाहेब ठाकरे यांना वाटत होते तसे एक सामान्य शिवसैनिक एकनाथ शिंदे यांच्या रुपात मुख्यमंत्री पदी विराजमान झाला. अशा या एकनाथ शिंदे यांचा ठाण्यातील रिक्षा चालक, शिवसैनिक ते महाराष्ट्राचा मंत्री पदापर्यंतचा प्रवास मोठा रंजक आणि थक्क करणारा आहे.

मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीची चर्चा सर्वत्र रंगली आहे. कट्टर शिवसैनिक आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे एकनिष्ठ कार्यकर्ते आनंद दिघे यांच्या तालमीत घडलेले एकनाथ शिंदे गेली अनेक वर्षे शिवसेनेसोबत सक्रिय राजकारणात आहेत. आनंद दिघे यांच्यानंतर ठाण्यात शिवसेना वाढवण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली. तसेच 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने भाजपशी काडीमोड घेतला त्यानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्यासोबतीने महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यातही एकनाथ शिंदेंचा मोठा सहभाग होता.

ठाण्याच्या मातीत राजकिय कारकिर्दीची जडणघडण झालेले एकनाथ शिंदे यांचा जन्म ९ फेब्रुवारी १९६४ रोजी साताऱ्यातील दरे या गावी झाला. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या शिंदेंची परिस्थिती तशी बेताचीच होती. त्यामुळे लहान वयातच एकनाथ शिंदेंनी गाव सोडलं आणि ठाणे गाठले. ते तिथेच स्थायिक झाले. ठाण्यातील कोपरीच्या मंगला हायस्कुलमधून त्यांनी शालेय शिक्षण, तर न्यू इंग्लिश स्कुलमधून अकरावीचं शिक्षण पूर्ण केले. अशातच आर्थिक अडचणींमुळे त्यांना महाविद्यालयीन शिक्षण सोडावे लागले. त्यानंतर त्यांनी नोकरी करण्यास सुरुवात केली.

ठाणे येथील वागळे इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये ते सुरुवातीच्या काळात एका माशांचा कंपनीत सुपरव्हायझर म्हणून कामाला लागले. नंतर त्यांनी ही नोकरी सोडली आणि ऑटो रिक्षा तसेच टेंपो चालवू उदरनिर्वाह करू लागले. या दरम्यान त्यांच्यावर सोन व्यक्तींचा प्रभाव पडला. एक होते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि दुसरे होते ठाण्याचे शिवसेना नेते आनंद दिघे. अठराव्या वर्षीच एकनाथ शिंदेंनी आनंद दिघे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश केला. दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पक्षाच्या कामाला सुरुवात केली. शिंदेच्या कामाचा धडका पाहून आनंद दिघे यांना त्यांच्या प्रति विश्वास वाढू लागला. आपल्या कामाने शिंदे यांनी आनंद दिघेंचे निकटवर्तीय म्हणून ओळख निर्माण केली. १९८४ साली वयाच्या विसाव्या वर्षी शिंदे यांच्यावर वागळेतील किसननगरच्या शाखाप्रमुखपदी नेमणूक करण्यात आली. इथूनच खऱ्या अर्थाने एकनाथ शिंदेंच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली.

शिंदेंनी शिवसेनेने दिलेल्या संधीचे सोनं केलं. कालांतराने त्यांचा लता शिंदे यांच्या सोबत विवाह झाला. दोघांना तीन मुलं झाली. दीपेश, शुभदा आणि श्रीकांत.१९९७ साली आनंद दिघे यांनी एकनाथ शिंदे यांना महापालिकेचे तिकीट दिलं. ते नगरसेवक म्हणून निवडून आले. राजकीय प्रवासाला चांगली सुरुवात झाली असतानाच २००० साली शिंदेंवर दुःखाचा डोंगर कोसळला. शिंदेंची दोन मुलं दीपेश आणि शुभदा यांचा अपघाती मृत्यू झाला. या दुःखातून बाहेर येण्यासाठी दिघे यांनी शिंदेंना खूप मदत केली. दुःखातून सावरल्यानंतर एकनाथ शिंदे पुन्हा राजकारणात सक्रिय झाले. २००१ साली शिंदे यांची ठाणे महापालिकेत सभागृह नेतपदी नियुक्ती करण्यात आली.

२००१ साली ते पुन्हा नगरसेवक झाले आणि पुढच्या दोनच वर्षांत त्यांना पक्षाकडून आमदारकीचं तिकीट मिळालं. २००२ ला दिघेंचे अकाली निधन झाल्यानंतर शिंदे यांनीच ठाण्यातील शिवसेनेचा डोलारा यशस्वीपणे हाताळला. ठाण्यासह कल्याण-डोंबिवली महापालिकेतही सेनेची सत्ता आणण्यात शिंदे यांचेच कसब होते. २००४ च्या आमदारकीच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांनी बाजी मारली. २००५ साल हे पुन्हा त्यांच्यासाठी महत्वाचं ठरलं. एकनाथ शिंदे ठाण्यात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख झाले. कुणा आमदाराला पक्षातील हे पद देण्याची ही पहिलीच वेळ होती.

2009 साली विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. शिंदे पुन्हा आमदार झाले. पुढे 2014 च्या विधानसभा निवडणुकीनंतर राजकारणाची समीकरणं बदलली. शिवसेना आणि भाजपची 25 वर्ष जुनी युती संपुष्टात आली. तर दोन्ही पक्षांनी स्वबळावर 2014 ची विधानसभा लढवली. त्या निवडणुकीत शिवसेना थोडी बॅकफुटवर गेली. पण शिंदें स्वत:चा गड राखण्यात यशस्वी झाले होते. दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला. 2014मध्ये शिवसेना विरोधी पक्षात बसणार होती. तेव्हा 12 दिवसांसाठी शिंदे गटनेते झाले. त्यानंतर शिवसेना सत्तेत गेल्यानंतर ते मंत्रीही झाले. शिंदे यांनी या आधी 2015 ते 2019 पर्यंत सार्वजनिक बांधकाम या खात्याचे मंत्री म्हणून काम पाहिले.

2019 साली राज्यात सत्तांतर झालं. भाजप काही शिवसेनेला मुख्यमंत्री पद देत नव्हतं. त्यामुळे युती पुन्हा संपुष्टात आली आणि महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले. शिवसेनेने चक्क राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत आघाडी स्थापन करत सत्ता हाती घेतली. सुरुवातीला मुख्यमंत्री पदाचा पेच कायम होताच. मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार, पण कोण? या शर्यतीत शिंदे यांचं नाव आघाडीवर होते. पण शरद पवारांच्या रणनितीमुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.

अखेर या ठाकरे सकरामध्ये एकनाथ शिंदे कॅबिनेट मंत्री झाले. शिवाजीपार्कवर झालेल्या शपथविधी सोहळ्यात 7 ते 8 नेत्यांनी मंत्रिपदाची शपथा घेतली. त्यात शिंदेंचा समावेश होता. त्यांच्याकडे नगरविकास मंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. ठाकरे सरकारला अडीच वर्षे पूर्ण झाली आहेत. या दरम्यान, भाजपने आपला जुना मित्र पक्ष शिवसेनेवर नेहमीच निशाणा साधला. विरोधकांच्या वारंवार होणा-या आरोपांविरोधात एकनाथ शिंदे पक्षाकडून अगदी ठामपणे उभे राहिले.

शिवसेनेने भाजपला सोडून राष्ट्रवादी आणि काँग्रेसोबत जाऊन बनवलेली महाविकास आघाडी विचांराच्या विपरीत होती. हिंदुत्त्ववादी शिवसेनेने कोठेतरी हिंदुत्त्वला बाजुला ठेवले आहे. अशी प्रतिमा निर्माण होत होती. शिवाय सरकारमध्ये राष्ट्रवादी कडून वारंवार शिवसेनेची कोंडी केली जात होती. शिवसेनेच्या मंत्र्यांना व आमदारांना निधी दिला जात नव्हता व मतदारसंघात देखिल राष्ट्रवादीकडून घूसखोरी केल्याचे आरोप शिवसेनेचे आमदार, मंत्री व सामान्य शिवसैनिकांकडून होत होती. हे सारे मंत्री एकनाथ शिंदे यांना देखिल पटत नव्हते. अखेर शिवसैनिकांचा, आमदारांचा व मंत्र्यांचा आवाज बनत शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरुद्ध बंड केले. त्यांनी शिवसेनेची ४० आमदार, मंत्री व १६ अपक्ष आमदार सोबत घेत शिवसेनेतच बंडखोर शिंदे गट स्थापन केला.

यावर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आपण भाजप सोबत जाऊन सत्ता स्थापन करु आणि राष्ट्रवादी व काँग्रेसला सोडूया असे सांगितले. पण, उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सोबत रहात त्यांचे सरकार अल्पमतात आल्याने त्यांनी राजीनामा दिला. अखेर शिंदे गट भाजप सोबत जात सत्तास्थापन करण्याचे स्पष्ट झाले. तसेच भाजपने देखिल एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देत शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली सत्ता स्थापन करत असल्याचे स्पष्ट केले. एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी मुख्यंमत्री पदाची शपथ घेत महाराष्ट्रात शिंदे शाहीचे सरकार भाजपच्या मदतीने स्थापन केले.

अखेर एक रिक्षा चालक, सामान्य शिवसैनिक ते मुख्यमंत्री असा थक्क करणारा प्रवास एकनाथ शिंदे यांनी केला आहे. अगदी सामान्य ते मुख्यमंत्री होणे हे हा प्रवास सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. आता येथून पुढे ते कोणती झेप घेतात हे देखिल पाहणे औत्सुकतेचे ठरणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news