nawab malik : नवाब मलिक यांचे पुत्र फराज यांना ईडी समन्स पाठवणार

nawab malik : नवाब मलिक यांचे पुत्र फराज यांना ईडी समन्स पाठवणार

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक (nawab malik) यांना अटक केल्यानंतर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) त्यांच्याकडे चौकशी सुरु केली आहे. मात्र नवाब मलिक हे तपासात सहकार्य करत नसल्याने ईडी त्यांचा मुलगा फराज याला समन्स बजावणार असल्याची माहिती मिळते.

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्यासह त्याचे कुटुंबीय आणि टोळीतील सदस्यांच्या मालमत्ता, बेनामी संपत्ती, सट्टेबाजी, खंडणी वसुली, ड्रग्ज आणि हवाला रॅकेट यातील आर्थिक बाबींच्या संबंधीत मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने बुधवारी पहाटे नवाब मलिक यांच्या घरी छापेमारी करुन त्यांना ताब्यात घेतले.

सुमारे साडे सात तासांच्या कसून चौकशी केल्यानंतर ईडीने नवाब मलिक यांना अटक केली. विशेष पीएलएमए न्यायालयाने नवाब मलिक यांना ०३ मार्चपर्यंत ईडीच्या कोठडी सुनावली आहे. त्यानुसार ईडीचे अधिकारी कोठडीमध्ये नवाब मलिक यांची कसून चौकशी करत आहेत.

ईडी कोठडीतील चौकशी दरम्यान, नवाब मलिक (nawab malik) हे सहकार्य करत नसून ईडीच्या अधिकाऱ्यांना धमकावत असल्याचे ईडीचे म्हणणे आहे. त्यामुळे कुर्ला जमीन व्यवहारात सक्रीय असलेल्या नवाब मलिक यांचा पुत्र फराज याला समन्स बजावून ईडी त्याच्याकडे चौकशी करणार आहे.

फराज यानेच विक्री करारासह मालमत्तेशी संबंधीत अन्य कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या केल्या होत्या. तसेच त्याने हसीना पारकर हिच्यासह तिच्या सहकाऱ्यांची दक्षिण मुंबईतील कार्यालयात इतर दोघांसह भेट घेत ५५ लाख रुपये दिले होते. या मालमत्तेचा सौदा १९९९ ते २००३ या दरम्यान झाला होता.

दरम्यान, ईडीने नवाब मलिक यांचा भाऊ इक्बालसोबत काम करत असलेल्या आणि त्यांचा दुसरा भाऊ अस्लम याला ओळखत असलेल्या अहमदउल्ला अन्सारी यांचा जबाब नोंदविला आहे.

अन्सारी आणि अस्लम हे दोघे फराजसोबत हसीना पारकर हिच्या दक्षिण मुंबईतील कार्यालयात ५० लाख रुपये रोख आणि ०५ लाखांचा धनादेश तिला देण्यासाठी गेले होते. यावेळी हसीनाचा विश्वासू सहकारी सलीम पटेल हा तेथे उपस्थित होता, असे ईडीचे म्हणणे आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news