नाशिक : पुढारी वृत्तसेवा
भारतीय राजकरणात शिष्याकडून गुरूला धोबीपछाड दिल्याच्या घटना नवीन नाहीत. त्याचाच प्रत्यय सन 2007 च्या नाशिक महापालिका पंचवार्षिक निवडणुकीत आला होता. आंबेडकरी चळवळीतील लढाऊ पँथर तथा माजी महापौर अशोक दिवे यांना त्यांचाच शिष्य असलेल्या प्रशांत प्रभाकर मोरे यांनी धूळ चारत महापालिकेत प्रवेश केला. अवघ्या 66 मतांनी दिवे यांना पराभव स्वीकारावा लागल्याने ही निवडणूक चांगली गाजली होती.
माजी महापौर अशोक दिवे यांचा टाकळी परिसर बाल्लेकिल्ला मानला जात होता. मात्र, सन 2007 च्या मनपा निवडणुकीत या परिसराची विभागणी होऊन 39 व 32 वॉर्ड तयार झाला होता. मुख्य टाकळीचा भाग वॉर्ड क्र. 32 ला जोडल्याने दिवे यांची व्होटबँक काही प्रमाणात विभागली गेली होती. त्यातच शिष्य म्हणून राजकारणाचे धडे गिरविलेल्या प्रशांत मोरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून आव्हान दिले होते. मोरे यांच्या उमेदवारीसाठी आणि प्रचारासाठी माजी आमदार जयंत जाधव यांनी पुढाकार घेतला होता.
काँग्रेसकडून वॉर्ड क्रमांक 39 मधून माजी महापौर दिवेंना, तर वॉर्ड क्रमांक 32 मधून माया दिवे यांना उमेदवारी देण्यात आली होती. वॉर्ड क्र. 39 ची निवडणूक खर्या अर्थाने लक्षवेधी ठरली. दिवे-मोरे यांच्या रूपाने गुरू-शिष्य आमनेसामने आले होते. यापूर्वीच्या निवडणुकीमध्ये प्रशांत मोरे यांनी दिवे यांच्या प्रचाराची धुरा राहुल व प्रशांत दिवे यांच्यासोबत संभाळली होती. त्यामुळे दिवे-मोरे लढतीकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले होते. मोरे यांना राष्ट्रवादीचे हेवीवेट नेते छगन भुजबळ यांचेही मोठे पाठबळ लाभले होते.
प्रशांत मोरे यांच्यावर मतदारांनी विश्वास दाखवत त्यांच्या पारड्यात 1 हजार 357 मते टाकली, तर माजी महापौर दिवे यांना 1 हजार 291 मते पडली. भाजपकडून उमेदवारी करणार्या माजी नगरसेविका उज्ज्वला हिरे यांना 911 मतांवर समाधान मानावे लागले. मनसेच्या अनिल मोढे यांना 679, तर अपक्ष अनिल रूपवते यांना 81 मते मिळाली होती. दिवेंचा अवघ्या 66 मतांनी पराभव झाला होता. हा पराभव दिवेंसह प्रचाराची जबाबदारी संभाळणार्या पुत्र राहुल यांच्या चांगलाच जिव्हारी लागणारा ठरला.
दरम्यान, अशोक दिवे यांना नवख्या उमेदवाराकडून पराभवाची चव चाखावी लागली असली, तरी शेजारच्या वॉर्ड क्रमांक 32 मधून त्यांच्या पत्नी माया दिवे ह्या सुमारे 200 मतांनी विजयी झाल्या होत्या. माया दिवे यांना 1 हजार 196 मते मिळाली होती. प्रतिस्पर्धी शिवसेनेच्या शमा कोथमिरे यांना 999, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विमल पगारे यांना 975, तर मनसेच्या निर्मला भवर व बसपाच्या मनीषा निकम यांना प्रत्येकी 136 मते पडली. माया दिवे यांच्या प्रचारासाठी पुत्र प्रशांत यांनी झोकून देऊन काम केले होते. पत्नीच्या रूपाने माजी महापौर मनपात दाखल झाले असले, तरी दिवे घराण्यात 'कभी खुशी.. कभी गम' असे चित्र होते.
पुढच्या निवडणुकीत दिवे-मोरे पॅनल
सन 2012 च्या मनपा पंचवार्षिक निवडणुकीत तत्कालीन नगरसेवक प्रशांत मोरे व राहुल दिवे या दोन मित्रांनी मागील निवडणुकीचे रुसवे-फुगवे विसरत प्रभाग क्रमांक 31 मध्ये पॅनल तयार केला होता. अनुसूचित जाती महिला प्रवर्गातून राष्ट्रवादीकडून मोरेंच्या पत्नी वैशाली यांनी, तर सर्वसाधारण प्रवर्गातून काँग्रेसकडून राहुल दिवे यांनी उमेदवारी केली होती. मनसेच्या मेघा साळवे यांनी वैशाली मोरेंचा अवघ्या 25 मतांची पराभव केला, तर दिवेंनी प्रतिस्पर्धी मनसेच्या सचिन पाटील यांचा 1 हजार 456 मतांनी धुव्वा उडवला होता. विशेष म्हणजे दोन्ही प्रवर्गांत भाजपचे उमेदवार तिसर्या स्थानी फेकले गेले होते.