Delhi Excise Policy | केजरीवाल सरकार अडचणीत! मद्य धोरण घोटाळाप्रकरणी दिल्ली, पंजाब, तेलंगणामध्ये ईडीचे छापे

ईडी
ईडी

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : मद्य धोरण घोटाळा प्रकरणी (Delhi Excise Policy) सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीने शुक्रवारी देशाची राजधानी दिल्ली तसेच पंजाब आणि तेलंगण या राज्यांमध्ये छापे टाकले. एकूण 35 ठिकाणांवर ही छापेमारी करण्यात आल्याचे ईडीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. केजरीवाल सरकारने अबकारी कर धोरणात बदल करुन मद्य निर्माते व विक्रेत्यांना कोट्यवधी रुपयांचा फायदा पोहोचविल्याचा तपास संस्थांचा आरोप आहे.

मद्य धोरण घोटाळ्याच्या अनुषंगाने याआधीही ईडी तसेच सीबीआयने देशाच्या विविध भागात छापेमारी केली होती. ताज्या छापेमारीमुळे केजरीवाल सरकारच्या अडचणीत वाढ झाल्याचे मानले जात आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया हे या घोटाळ्यातील प्रमुख आरोपी आहेत. दिल्ली, पंजाब आणि तेलंगणमधील मद्य कंपन्या, वितरक तसेच कंपन्यांशी संबंधित संस्थांच्या ठिकाणांवर ईडीने शुक्रवारी सकाळपासून छापेमारीची कारवाई केली.

दरम्यान, ईडीच्या कारवाईवर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जोरदार टीका केली आहे. आतापर्यंत पाचशेपेक्षा जास्त ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. सिसोदिया यांच्याविरोधात एक पुरावा शोधण्यासाठी तीन महिन्यांपासून सीबीआय व ईडीचे तीनशेपेक्षा जास्त अधिकारी चोवीस तास कष्ट उपसत आहेत. आपल्या गलिच्छ राजकारणासाठी काही लोक अधिकाऱ्यांचा बहुमूल्य वेळ वाया घालवत आहेत. अशा स्थितीत देश कसा काय पुढे जाणार, हा प्रश्न आहे, असे केजरीवाल यांनी सोशल मीडीयाच्या माध्यमातून म्हटले आहे.

मद्य धोरण घोटाळा प्रकरणी ईडीने अलिकडेच प्रसिद्ध मद्य व्यावसायिक समीर महेंद्रू याला अटक केली होती. तत्पूर्वी आम आदमी पक्षाचा नेता व एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीचा मुख्य कार्यकारी अधिकारी विजय नायर याला अटक करण्यात आली होती. तिकडे सीबीआयने या प्रकरणात उपमुख्यमंत्री सिसोदिया यांच्यासह आठजणांविरोधात लूकआऊट नोटीस जारी केलेली आहे. सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरमध्ये एकूण नऊ लोकांची नावे आहेत. (Delhi Excise Policy)

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news