पुढारी ऑनलाईन: अर्जेंटिना आणि चिलीत बुधवारी (दि.२२) रात्री साडेदहाच्या सुमारास तीव्र भूकंपाचे धक्के बसले. या भूकंपाची तीव्रता अर्जेंटिना-६.५, चिली-६.३ अशी होती. या भूकंपाची तीव्रता अधिक असली तरी यामध्ये कोणत्याही प्रकारे जीवित आणि वित्त हानी झालेली नाही. कोणत्याही प्रकराचे नुकसान झाले नसल्याची माहिती भूकंप विज्ञान केंद्रांनी दिली आहे.
अर्जेंटिनाला बुधवारी (दि.२२) रात्री उशिरा तीव्र भूकंपाचे धक्के बसल्याची माहिती यूएस जिऑलॉजिकल सर्वेने दिली आहे. अर्जेंटिनामधील सॅन अँटोनियो डे लॉस कोब्रेसच्या उत्तर-वायव्येस ८४ किलोमीटर अंतरावर ६.५ तीव्रतेचा भूकंप झाल्याची नोंद करण्यात आली आहे. अधिक तीव्रतेचा हा भूकंप असला तरी, कोणत्याही प्रकारची जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही. सॅन अँटोनियो डी लॉस कोब्रेस हे अर्जेंटिनाच्या वायव्येला असलेले एक लहान शहर आहे.
यूएस जिऑलॉजिकल सर्वेने (USGS) दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री उशिरा १०.३० च्या सुमारास अर्जेंटिनामधील सॅन अँटोनियो डे लॉस कोब्रेस या शहराला भूकंपाचे धक्के बसले. या भूकंपाचा केंद्रबिंदू पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 210 किमी खाली होता.
चिलीच्या इक्विकमध्ये देखील बुधवारी (दि.२२) रात्री १०.३० च्या सुमारास ६.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. या भूकंपाचा केंद्रबिंदू चिलीच्या इक्विक शहरापासून ५१९ किमी आग्नेय दिशेला होता. तर केंद्रबिंदू पृथ्वीच्या पृष्ठभागापासून २०४ किमी खोलीवर होता, अशी माहिती नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने (एनसीएस)दिली आहे. या शहरात देखील कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. इक्विक हे उत्तर चिलीमधील अटाकामा वाळवंटाच्या पश्चिमेकडील किनारपट्टीचे शहर आहे.