file photo
file photo

मोठा दिलासा! सांगली, कोल्हापुरातील पूरस्थिती नियंत्रणात, कर्नाटकातील अलमट्टी धरणातून २ लाख क्यूसेकने पाण्याचा विसर्ग

बेळगाव/ सांगली : पुढारी वृत्तसेवा : कर्नाटकातील अलमट्टी धरणातून २ लाख क्यूसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील पूर परिस्थिती नियंत्रणात राहिली आहे. सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील महापुरास कारणीभूत ठरणार्‍या कर्नाटकातील अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग चांगल्या पद्धतीने सुरू आहे.

सोमवारी ५० हजार असणारा विसर्ग मंगळवारी १ लाख करण्यात आला होता. बुधवारी सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातून या धरणात एक लाख क्यूसेकपेक्षा जादा पाणी जात होते. त्यामुळे सकाळी विसर्ग (जावक) दीड लाख तर सायंकाळी एक लाख ७५ हजार आणि रात्री विसर्ग दोन लाखांपर्यंत करण्यात आला असल्याचे पाटबंधारे विभागातून सांगण्यात आले. यामुळे सांगली जिल्ह्यातील पूरस्थिती नियंत्रणात आहे.

दरम्यान, गुरुवारी (दि.११) सकाळी ८ वाजता अलमट्टी धरणातून २ लाख क्यूसेकने विसर्ग सुरु होता. अलमट्टी धरणाची क्षमता १२३.०१ टीएमसी असून, या धरणामध्ये सध्या १११.६४४ (९०.७६ टक्के) टीएमसी पाणीसाठा आहे. गेल्या काही दिवसांपासून पाण्याची आवक वाढू लागल्याने बुधवारी सकाळी ८ वाजल्‍यापासून धरणातील विसर्ग सव्वा लाख क्यूसेक करण्यात आला होता. आता विसर्ग वाढवून २ लाख क्यूसेकपर्यंत करण्यात आला आहे. गेल्या २४ तासांपासून या धरणात सरासरी १ लाख ३१ हजार ३३० क्यूसेक पाण्याची आवक होत आहे. पाण्याचा विसर्ग वाढवल्याने धरणातील पाणीसाठा आता ९० टक्क्यांवर आला आहे.

पंचगंगेची पाणी पातळी ४१ फूट ७ इंच

दरम्यान, गुरुवारी (दि.११) सकाळी १० वाजता पंचगंगेची राजाराम बंधारा पाणी पातळी ४१ फूट ७ इंच इतकी होती. (पंचगंगा नदी इशारा पातळी -३९ फूट व धोका पातळी – ४३ फूट आहे). जिल्ह्यातील एकुण ७३ बंधारे पाण्याखाली आहेत.

logo
Pudhari News
pudhari.news