पंचगंगा धोका पातळीकडे | पुढारी

पंचगंगा धोका पातळीकडे

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात बुधवारी पावसाचा जोर ओसरला. पावसाने उघडीप दिली, तरीही दिवसभरात पाणी पातळीत वाढ सुरूच असल्याने पंचगंगा धोका पातळीकडे चालली आहे. राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे खुले झाले होते. त्यामुळे पंचगंगा गुरुवारपर्यंत धोका पातळी गाठण्याची शक्यता असल्याने कोल्हापूरवर महापुराचे सावट कायम आहे.

कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर पाणी आल्याने त्यावरील वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आली. कसबा बावडा ते शिये मार्गावर तस्ते ओढ्यावरही पाणी आले. पाणी पातळी वाढत असल्याने पूरग्रस्त भागातील नागरिकांचे स्थलांतर सुरू करण्यात आले आहे. दरम्यान, कोल्हापूर-गगनबावडा मार्गावरील पाणी ओसरल्याने त्यावरील वाहतूक पूर्ववत झाली.

जिल्ह्यात बुधवारी सकाळपासूनच पावसाने उसंत घेतली. सकाळपासूनच वारंवार सूर्यदर्शन होत होते. दुपारी काही काळ कडकडीत ऊनही पडले होते. यामुळे अनेक दिवसांपासून ओलेचिंब असलेले शहरातील रस्ते वाळले होते. अधूनमधून कोसळणारी एखादी सर वगळता गेल्या पाच दिवसांनंतर प्रथमच दिवसभर पावसाची उघडीप होती. पावसाने विश्रांती घेतल्याने गेल्या काही दिवसांपासून विस्कळीत झालेले जनजीवनही पूर्वपदावर आले.

धोका पातळीपासून पंचगंगा केवळ पावणेदोन फुटांवर

जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला, तरी नद्यांच्या पाणी पातळीत दिवसभर संथपणे वाढ सुरूच राहिली. पंचगंगेच्या पातळीत 15 तासांत सव्वा फुटाने वाढ झाली. सकाळी सात वाजता पाणी पातळी 40 फूट होती. रात्री दहा वाजता ती 41.3 फुटांवर गेली. धोका पातळी 43 फूट असून, ती गाठण्यासाठी पावणेदोन फूट पाणी कमी आहे. राधानगरी धरणासह कुंभी, कोदे, कासारी धरणांतून सुरू असणार्‍या विसर्गामुळे गुरुवारी पंचगंगा धोका पातळी गाठण्याची शक्यता आहे.

जामदार क्लबजवळ पाणी

पंचगंगेचे पाणी शिवाजी पुलाकडे जाणार्‍या रस्त्यावरून सायंकाळी जामदार क्लबपर्यंत आले आहे. कोल्हापूर-रत्नागिरी रस्त्यावर केर्ली ते केर्लेदरम्यान कासारी नदीचे पाणी आले. तेथे सकाळी अर्धा फूट असणारे पाणी दुपारी एका फुटापर्यंत वाढले. यामुळे करवीर आणि पन्हाळा पोलिसांनी दोन्ही बाजूंनी बॅरिकेडिंग लावून हा मार्ग वाहतुकीसाठी बंद केला. केर्ली-गायमुख-वाघबीळ अशा पर्यायी मार्गावरून ही वाहतूक वळवण्यात आली.

गगनबावडा मार्गावरील पाणी ओसरले

चिखली-वरणगे मार्गावरही संगमाजवळ पाणी आले. त्यातूनच उशिरापर्यंत वाहतूक सुरू होती. यासह जिल्ह्यातील 7 इतर जिल्हा मार्ग आणि 17 ग्रामीण मार्गांवरही पाणी आल्याने त्यावरील वाहतूक बंद आहे. कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर तीन ठिकाणी आलेले पाणी बुधवारी ओसरले. यामुळे दोन दिवसांपासून बंद असलेला हा मार्ग बुधवारी दुपारी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.

कसबा बावडा-शिये मार्गावर पाणी

कसबा बावडा ते शिये मार्गावर तस्ते ओढ्यावर सायंकाळी सहा वाजता पाणी आले. रात्री या ठिकाणी सुमारे पाऊण ते एक फूट पाणी होते. त्यातूनच वाहतूक सुरू होती. बुधवारी सकाळी सात वाजेपर्यंत गेल्या 24 तासांत चिकोत्रा वगळता उर्वरित प्रमुख 14 धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झाली. नऊ धरणांच्या पाणलोट क्षेत्रात 100 मि.मी.पेक्षा जादा पाऊस झाला. राधानगरी धरण परिसरात 122 मि.मी. पाऊस झाला. यामुळे राधानगरी धरण बुधवारी पहाटे पूर्ण क्षमतेने भरले. दुपारी सव्वातीन वाजेपर्यंत धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे खुले होते. यामुळे धरणातून एकूण 7 हजार 212 क्यूसेक विसर्ग सुरू आहे. वारणा धरणातून 9 हजार 448 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीतही वाढ होत आहे. वारणा धरण 90 टक्के, चिकोत्रा 92, तर तुळशी धरण 91 टक्के भरले आहे.

76 बंधारे पाण्याखाली

नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होतच असल्याने वारणा, दूधगंगा आणि ताम—पर्णी या नद्यांवरील आणखी प्रत्येकी दोन बंधारे पाण्याखाली गेले. यामुळे जिल्ह्यात पाण्याखाली गेलेल्या बंधार्‍यांची संख्या 76 वर गेली आहे. त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने सुरू आहे.

गगनबावड्यात अतिवृष्टी

जिल्ह्यात गेल्या 24 तासांत बुधवारी सकाळी आठ वाजेपर्यंत सरासरी 32.5 मि.मी. पाऊस झाला. गगनबावडा तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली. तिथे 96.9 मि.मी. पाऊस झाला. शाहूवाडीत 56.2, राधानगरीत 54.2, चंदगडमध्ये 51.4, पन्हाळ्यात 48.9, आजर्‍यात 44.5, भुदरगडमध्ये 35.6, करवीरमध्ये 26.4 मि.मी. पाऊस झाला.

Back to top button