अलमट्टीतून विसर्ग : सांगली जिल्ह्यातील पूरस्थिती नियंत्रणात; चांदोलीतून ९४४८ विसर्ग | पुढारी

अलमट्टीतून विसर्ग : सांगली जिल्ह्यातील पूरस्थिती नियंत्रणात; चांदोलीतून ९४४८ विसर्ग

सांगली; पुढारी वृत्तसेवा : कर्नाटकातील अलमट्टी धरणातून दोन लाख क्यूसेकने विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पूर परिस्थिती नियंत्रणात राहिली आहे.

जिल्ह्यातील महापुरास कारणीभूत ठरणार्‍या कर्नाटकातील अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग चांगल्या पद्धतीने सुरू आहे. सोमवारी 50 हजार असणारा विसर्ग मंगळवारी एक लाख करण्यात आला. बुधवारी सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातून या धरणात एक लाख क्यूसेकपेक्षा जादा पाणी जात होते. त्यामुळे सकाळी विसर्ग (जावक) दीड लाख तर सायंकाळी एक लाख 75 हजार आणि रात्री विसर्ग दोन लाखांपर्यंत करण्यात आला असल्याचे पाटबंधारे विभागातून सांगण्यात आले. यामुळे सांगली जिल्ह्यातील पूरस्थिती नियंत्रणात आहे.

चांदोली धरणातून प्रतिसेंकद 9448 क्यूसेक पाण्याच्या विसर्ग सुरू आहे. यामुळे वारणा नदीचे पाणी वाढत आहे. तसेच पाणलोट क्षेत्रातील पाण्यामुळे कृष्णा नदीचेही पाणी वाढत आहे. बुधवारी दिवसभरात सांगलीत पाणी पाच फूट वाढले. आयर्विन पुलाजवळ पाणी पातळी 25 फूट होती. ती गुरुवारी 28 फुटांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

कोयना धरणात प्रतिसेंकद 60 ते 70 हजार क्यूसेक पाणी येत आहे. त्यामुळे धरण गतीने भरत आहे. कोयना धरणात सध्या 81 टीएमसी पाणी आहे. धरण 77 टक्के भरले आहे. धोम धरण 10.52 टीएमसी म्हणजे 78 टक्के भरले आहे. या दोन्ही धरणातून अजूनही पाणी सोडण्यास सुरुवात केलेली नाही.

कण्हेर धरणात सुमारे 13 हजार क्यूसेक पाणी येत आहे. या धरणात 8.56 टीएमसी म्हणजे 85 टक्के साठा झाला आहे. या धरणातून 8219 क्यूसेक पाणी नदीपात्रात सोडले जात आहे. चांदोलीतही प्रतिसेंकद 15 हजार क्यूसेक पाण्याची आवक सुरू असल्याने धरणातून बुधवारी 9448 क्यूसेक पाणी सोडले जात आहे. कृष्णा नदीची पातळीही वेगाने वाढत आहे. बुधवारी आयर्विन पुलाजवळ पाणी 26 फूट झाले. गुरुवारी सायंकाळपर्यंत सांगलीत पाणी 27 ते 28 फुटापर्यंत जाण्याची शक्यता आहे.

धरणांतील पाणीसाठा (टीएमसी)

  • कोयना : 80.41 (77 टक्के)
  • धोम :10.52 (78 टक्के)
  • कण्हेर : 8.56 (85 टक्के)
  • चांदोली : 31.05 (91 टक्के)
  • अलमट्टी : 116 टीएमसी (क्षमता 123)

विविध पुलांजवळील पाणीपातळी (फुटांमध्ये)
(धोका पातळी/आताची पातळी )

  • कृष्णा पूल-कराड : (55.0)/18
  • भिलवडी पूल : (53)/27
  • सांगली-आयर्विन : (45)/26
  • राजापूर बंधारा : (58)/39
  • राजाराम बंधारा : (43)/42

Back to top button