Nitin gadkari : पुण्यात आता दुमजली महामार्ग; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची माहिती

Nitin gadkari : पुण्यात आता दुमजली महामार्ग; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची माहिती

पुणे; पुढारी वृत्तसेवा : चांदणी चौकातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी केलेल्या प्रकल्पानंतर पुण्यात आता दुमजली महामार्ग बांधण्यात येणार असल्याचे केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी सांगितले. पुण्यात 50 हजार कोटी रुपये खर्चून उड्डाणपूल बांधणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. बाणेर येथील युरोकुल युरोलॉजी इन्स्टिट्यूट येथे उभारण्यात आलेल्या पहिल्या रोबोटिक युरोलॉजी सेंटरचे उद्घाटन नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी युरोकुलचे संचालक डॉ. संजय कुलकर्णी आणि डॉ. ज्योत्स्ना कुलकर्णी, म्हैसकर फाउंडेशनच्या सुधा म्हैसकर, जयंत म्हैसकर, आमदार भीमराव तापकीर उपस्थित होते.

संबंधित बातम्या :

गडकरी म्हणाले, 'नुकत्याच झालेल्या जी-20 परिषदेतून जैवइंधनाच्या निर्मितीला चालना मिळणार आहे. लवकरच शेतकर्‍यांनी तयार केलेल्या इथेनॉलपासून तयार झालेल्या इंधनावर विमाने उडू शकतील. बायो-सीएनजी, बायोएलएनजी, इथेनॉल अशी प्रगती आपण साधत आहोत. त्याचप्रमाणे वैद्यकशास्त्रातही वेगाने बदल होत आहेत.' डॉ. संजय कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. डॉ. ज्योत्स्ना कुलकर्णी यांनी रोबोटिक युरोलॉजी सेंटरची माहिती दिली. बाणेर बालेवाडी मेडिकल असोसिएशनचे डॉ. राजेश देशपांडे यांनी आभार मानले.

काय म्हणाले गडकरी…

  • पूर्वी कोणत्याही उपचारांसाठी मुंबई किंवा दिल्लीला जावे लागायचे. आता पुण्यातही अद्ययावत वैद्यकीय उपचार मिळणे शक्य झाले आहे. तामिळनाडूमध्ये विमानतळावरून प्रत्यारोपणासाठी अवयव वेगाने रुग्णालयांपर्यंत पोहचावेत, यासाठी ड्रोन पोर्ट तयार करण्यात येत आहे. आपल्याकडेही असा ड्रोन पोर्ट तयार करता येईल.
  • आगामी काळात रोबोटिक सर्जरीच्या तंत्रज्ञानाचा अनेक रुग्णांना उपयोग होईल. अमेरिकेतील दहा डॉक्टरपैकी चार ते पाच डॉक्टर भारतीय आहेत. युरोपमध्येही हीच परिस्थिती आहे.
  • संशोधनाला चालना मिळाल्यास असाध्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काम करता येऊ शकेल.
  • दरवर्षी सुमारे 5 लाख रस्ते अपघातांत जवळपास दीड लाख लोक मृत्युमुखी पावतात. त्यामुळे महामार्ग, रस्त्यांना संलग्न वैद्यकीय सुविधा वाढवण्यावर भर देणार आहे. अशा 670 रुग्णालयांचे काम सुरू करणार असून, 270 ठिकाणी हेलिपोर्ट बांधली जाणार आहेत.
  • जगात सर्वाधिक तरुण आपल्या देशात आहेत. अद्ययावत ज्ञान ही आपली खूप मोठी ताकद
    आहे. ज्ञानाचे संपत्तीत रूपांतर करण्यावर माझा विश्वास आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news