अक्साई चीनमधील पूर्वतयारी चिंताजनक

अक्साई चीनमधील पूर्वतयारी चिंताजनक
Published on
Updated on

अक्साई चीनमध्ये झपाट्याने सुरू असलेली बांधकामे आणि अक्साई चीन आणि अरुणाचल प्रदेश हे चीनचाच हिस्सा आहे हे दर्शवणारे नकाशे यावरून चीनला 1954 पासून सुरू असलेल्या सीमावादावर तसेच 2020 पासून चिघळलेल्या सैनिकी सीमावादावर तोडगा काढण्याची किंवा सोडवण्याची अजिबात इच्छा नाही. त्यामुळे अक्साई चीनमध्ये सुरू झालेले बांधकाम हळूहळू तिबेट आणि हिमाचल, उत्तराखंड, सिक्कीम, अरुणाचल प्रदेशच्या सीमेपर्यंत तर जाणार नाही ना, ही भारतीय संरक्षणतज्ज्ञांची भीती निःसंशयपणे रास्त आहे, असे म्हणता येईल.

उपग्रहाच्या माध्यमातून प्रसिद्धीस आलेले अक्साई चीनमधल्या एका साईटचे काही फोटो सोशल मीडियावर गाजताहेत. राहुल गांधी चार मित्रांसह ऑगस्टच्या तिसर्‍या आठवड्यात लडाखला मोटर सायकल ट्रिपवर गेले असता त्यांनी याच फोटोंचा संदर्भ देत, सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. चीन आपल्या जमिनीवर पक्के बांधकाम करत आहे, तरी हे सरकार यावर काहीच कारवाई का करत नाही, असा त्या टीकेचा मथितार्थ होता. विरोधी पक्ष आणि सरकार विरोधक टीकाकारांच्या हाती हे आयते कोलीत लागले आहे. उपग्रह फोटोंमधील साईट ही अक्साई चीन या 1953-54 पासून चीनच्या ताब्यात असलेल्या क्षेत्रात आहे. ही साईट लडाखमध्ये 1962 पासून प्रचलित व अमलात असलेल्या लाईन ऑफ अ‍ॅक्च्युअल कंट्रोलच्या (एलएसी) पूर्वेला असणार्‍या अक्साई चीनमधून भारतात येणार्‍या एका नदीभोवतालच्या पहाडात आहे. अक्साई चीन हा आमचाच आहे आणि चीनने यावर अवैध कब्जा केलेला आहे, हे भारत जगाला आणि पर्यायाने चीनला 1957 पासून सांगत आहे. लडाखमधील देस्पांग क्षेत्राच्या 60 किलोमीटर पूर्वेला असलेल्या या साईटवर नदीच्या दोन्ही किनार्‍यांवरील पहाडांना फोडून, मोठ्या प्रमाणात सिमेंटचे बंकर्स आणि बोगदे बांधले जात आहेत, हे या उपग्रहीय फोटोंच्या विश्लेषणातून स्पष्ट होते. मागील तीन-चार महिन्यांमधील उपग्रहीय फोटोंची तुलना केली असता पहाडांमध्ये खोदलेल्या 11 बंकर्स आणि 6 शेल्टर्सच्या छाया स्पष्ट ओळखता येतात.

अक्साई चीन आणि अरुणाचल प्रदेश हे चीनचाच हिस्सा आहे हे दाखवणारे नवे नकाशे चीनने गेल्या महिन्यात प्रसिद्ध केले होते; पण भारतीय परराष्ट्रखात्याने ते नकाशे तत्काळ फेटाळून लावले. 1954 पासून चीन हेच करत आला आहे. प्रत्येक वेळी भारतात काही महत्त्वाची घटना घडणार असेल तेव्हा चीन अशाच आगळिकी करतो. यावेळी सप्टेंबर महिन्यात होणार्‍या जी-20 बैठकीच्या अनुषंगाने चीनने ही कारवाई केली आहे; पण असे केल्याने जमिनीवरील प्रत्यक्ष परिस्थिती बदलत नाही. केवळ असे विचित्र दावे केल्यामुळे दुसर्‍यांची जमीन आपली होत नाही. आमची जमीन कोणती आहे, हे आम्हाला नीट ठाऊक आहे, अशा शब्दांत परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी चीनला खडसावले आहे. 4 सप्टेंबर रोजी रशियन राष्ट्रपतींनी या भारतीय वक्तव्याचे समर्थन केले. संरक्षणतज्ज्ञ आणि विश्लेषकांनुसार, अक्साई चीनमधल्या कारवायांमधून चीनची सामरिक व डावपेचात्मक हतबलता उजागर होते.

चीनच्या तुलनेत भारतीय वायुसेनेकडे जास्त मारक क्षमता आणि ताकद असल्याने चीनला ही हतबलता आली आहे, असे म्हटल्यास ते वावगे होणार नाही. हा सर्व परिसर भारतीय वायुसेना आणि हेवी आर्टिलरीच्या अचूक मार्‍याच्या टप्प्यात येत असल्यामुळे चीनने एलएसीच्या इतक्या जवळ पहाडांच्या आतमध्ये बांधकाम करून त्याद्वारे भारताच्या वरचष्म्याला आळा घालण्याचा प्रयत्न केला आहे. लडाखमधल्या गलवान येथील 2020 मधील चकमकीनंतर भारताने या क्षेत्रातील एयर, आर्टिलरी, मिसाईल आणि रॉकेटरीच्या आक्रमक फायर पॉवरमध्ये मोठ्या प्रमाणात वृद्धी केली आहे. या आक्रमकतेने चीनला बिळात जायला भाग पाडले आहे.

चीनने तैवानवर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला, तर क्वाड संघटनेचा सदस्य म्हणून भारताला चीनच्या दक्षिण सीमेचे उल्लंघन करावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. चीनलाही याची कल्पना असल्यामुळे तो त्या आक्रमणाच्या संभाव्य मार्गावर भारतीय सेनेला हानी पोहोचवण्याची तयारी अक्साई चीनमध्ये करत आहे. याउलट चीनला भारतावर आक्रमण करायचे असेल, तर ते याच मार्गाने होण्याची शक्यता असल्यामुळे भारतीय सैन्याच्या हल्ल्यांपासून रक्षणासाठी चीन ही तयारी करत आहे, हेदेखील स्पष्ट होत आहे.

चीन या क्षेत्रात झपाट्याने पक्की बांधकामे करत आहे. या बंकर्स आणि शेल्टर्सची रचना बॉम्बचा प्रेशर इम्पॅक्ट कमी करण्यासाठी केली गेली आहे. यासाठी त्यांच्या आजूबाजूला बॉम्ब मार्‍याचा प्रभाव कमी करण्यासाठी मातीचे ढीग टाकलेले दिसतात. खोर्‍यात असलेला एकच रस्ता सुमारे 12 ते 15 फूट रुंद करण्यात आला असून तो पक्का झालेला दिसतो. अक्साई चीनमध्ये झपाट्याने सुरू असलेली बांधकामे आणि अक्साई चीन आणि अरुणाचल प्रदेश हे चीनचाच हिस्सा आहे, हे दर्शवणारे नकाशे यावरून चीनला 1954 पासून सुरू असलेल्या सीमावादावर तसेच 2020 पासून चिघळलेल्या सैनिकी सीमावादावर तोडगा काढण्याची किंवा सोडवण्याची अजिबात इच्छा नाही. त्यामुळे अक्साई चीनमध्ये सुरू झालेले बांधकाम हळूहळू तिबेट आणि हिमाचल, उत्तराखंड, सिक्कीम, अरुणाचल प्रदेशच्या सीमेपर्यंत तर जाणार नाही ना, ही भारतीय संरक्षणतज्ज्ञांची भीती निःसंशयपणे रास्त आहे, असे म्हणता येईल.

2020-21 मधील उपग्रहीय फोटोंमध्ये अक्साई चीनमधल्या वर उल्लेखित नदीखोर्‍यात कमी बांधकाम दिसले होते; पण ताज्या फोटोंमध्ये तेथील परिस्थिती मोठ्या प्रमाणावर बदललेली दिसून येते. एकीकडे आम्हाला भारत चीन सीमेवरील ताण लवकरात लवकर कमी करायचा आहे, असे चीनी राष्ट्रपती शि जिनपिंग म्हणतात. जून, 2020ची गलवान चकमक, चीनच्या आगामी सामरिक धोरणाची झलक होती, असे म्हटल्यास ते वावग होणार नाही. त्या चकमकीनंतर भारताने लडाखमध्ये खूप मोठ्या प्रमाणात फॉरवर्ड एयर बेसेस, रोड आणि बंकर कन्स्ट्रक्शन सुरू केली आहेत.

1954 मध्ये चीनने अक्साई चीन अवैध रित्या हस्तगत केल्याचे प्रकरण आपण लगेच संयुक्त राष्ट्र संघात न नेल्यामुळे या भागावरील चीनचा कब्जा दृढ होत गेला. गतवर्षी चीनी कम्युनिस्ट पार्टीच्या प्लेनरी सेशनमध्ये जिनपिंग यांनी आगामी तीस वर्षातील चीनची युद्धनीती विषद केली होती. त्या कार्यक्रमानुसार चीन 2047 पर्यंत लडाख व अरुणाचल प्रदेश हस्तगत करेल. त्यासाठी चीनने तिबेटच्या अक्साई चीनमध्ये आतापासूनच तयारी सुरू केली आहे. भारताला देखील योग्य ती पाऊल उचलावी लागतील.

– अभय पटवर्धन,
कर्नल (निवृत्त)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news