पुढारी ऑनलाईन डेस्क : जगभरातील अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये नोकरकपात सुरु आहे. आता मनोरंजन क्षेत्रातील दिग्गज कंपनी वॉल्ट 'डिस्ने'ने (Disney) या आठवड्यात नोकरकपात सुरू करणार असल्याची घोषणा केली आहे. कॉर्पोरेट खर्च कमी करण्याचा आणि रोख प्रवाहाला चालना देण्याचा 'डिस्ने'चा प्रयत्न आहे. एका नवीन रिपोर्टमध्ये असे सूचित केले आहे की नोकरकपातीच्या पहिल्या तीन फेरीत सुमारे ७ हजार नोकऱ्या कमी केल्या जाणार आहेत. या तीन फेऱ्यातील नोकरकपातीचा डिस्नेचा मीडिया आणि वितरण विभाग, पार्कस, रिसॉर्ट्स आणि ESPN वर परिणाम होणार आहे. या नोकरकपातीमुळे कंपनीला ५.५ अब्ज डॉलर खर्च कमी करण्यास मदत होईल. ज्यात ३ अब्ज डॉलर कंटेंटवरील खर्चाचा समावेश आहे, असा दावा 'डिस्ने'ने केला आहे.
डिस्नेचे मुख्य कार्यकारी बॉब इगर यांनी पाठवलेल्या मेमोनुसार, पुढील चार दिवसांत लीडर्संना थेट प्रभावित कर्मचार्यांच्या पहिल्या गटापर्यंत नोकरकपातीच्या निर्णयाची माहिती पोहोचविण्यास सांगितले जाईल, असे वृत्त CNBC ने दिले आहे. नोकरकपातीच्या दुसरी फेरीत कर्मचाऱ्यांची संख्या अधिक असेल. एप्रिल महिन्यात कर्मचार्यांना आणखी हजारो कर्मचारी कपातीची सूचना दिली जाईल. उन्हाळ्याच्या सुरुवातीपूर्वी नोकरकपातीची तिसरी आणि अंतिम फेरी होईल. यामुळे २०२४ मध्ये कंपनीचे नुकसान थांबेल, असे डिस्नेचे म्हणणे आहे.
Disney कर्मचार्यांना पाठवलेल्या मेमोमध्ये मुख्य कार्यकारी बॉब इगर यांनी म्हटले आहे की, "आम्ही कंपनीच्या धोरणात्मक पुनर्रचनेचा एक भाग म्हणून आमच्या एकूण मनुष्यबळांपैकी सुमारे ७ हजार नोकऱ्या कमी करण्याचा कठीण निर्णय घेतला आहे. ज्यात खर्च-बचत उपायांचा समावेश आहे."
इतर टेक आणि मीडिया कंपन्यांनीदेखील गेल्या वर्षाच्या अखेरपासून नोकरकपात सुरु केली आहे. वॉर्नर ब्रदर्स सारख्या मीडिया कंपन्यांसह डिस्कव्हरी तसेच मेटा, ॲमेझॉन आणि गुगल सारख्या मोठ्या टेक कंपन्यांही नोकरकपात केली आहे.
हे ही वाचा :