पुढारी ऑनलाईन डेस्क : टेक दिग्गज कंपनी मायक्रोसॉफ्ट (Microsoft) आता तिसऱ्या फेरीत आणखी नोकरकपात करत आहे. तिसऱ्या फेरीत पुरवठा साखळी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT) संबंधित पदांवरील कर्मचार्यांना कामावरुन कमी केले जाणार आहे. CRN च्या रिपोर्टनुसार, तिसऱ्या फेरीतील नोकरकपात ही मायक्रोसॉफ्टने याआधी जाहीर केलेल्या १० हजार नोकरकपातीचा भाग आहे. ही नोकरकपात कंपनीमधील विविध विभाग, फंक्शन्स, टीम्स आणि भौगोलिक क्षेत्रांमध्ये असेल, असे कंपनीच्या हवाल्याने या रिपोर्टमध्ये म्हटले आहे.
वॉशिंग्टन राज्यात मायक्रोसॉफ्टने हल्लीच ६८९ कर्मचार्यांना काढून टाकले आहे. मायक्रोसॉफ्टने फेब्रुवारीमध्ये वॉशिंग्टनमधील ६१७ कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी केले. याच महिन्यात कंपनीने कॅलिफोर्नियातील १०८ पदे कमी केली होती.
"जानेवारीमध्ये मायक्रोसॉफ्टने वॉशिंग्टन राज्याला ८७८ कर्मचार्यांची कपात केल्याचे कळवले होते. यामुळे या राज्यातील कर्मचारी कपातीचा आकडा एकूण २,१८४ वर पोहोचला आहे," असे रिपोर्टमध्ये नमूद केले आहे. मायक्रोसॉफ्टच्या एका कर्मचाऱ्याच्या लिंक्डइन पोस्टनुसार, कंपनीने त्यांचा AI-powered automation effort Project Bonsai बंद केला आहे आणि यातील टीमला काढून टाकण्यात आले आहे.
Microsoft चे चेअरमन आणि सीईओ सत्या नाडेला यांनी जानेवारीमध्ये घोषणा केली होती की कंपनी काही बदल करणार आहे ज्यामुळे एकूण कर्मचार्यांपैकी आर्थिक वर्ष २०२३ च्या तिसऱ्या तिमाहीच्या अखेरीस १० हजार नोकऱ्या कमी केल्या जातील". मायक्रोसॉफ्टमध्ये सध्या २ लाख २० हजारपेक्षा जास्त कर्मचारी आहेत आणि यातील सुमारे ५ टक्के कर्मचाऱ्यांना नोकरकपातीचा फटका बसला आहे.
हे ही वाचा :