नागपूर, पुढारी वृत्तसेवा : लोकसभेच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्पात मतदानाच्या दिवशी निवडणुक आयोगाने जाहीर केलेल्या टक्केवारीत तब्बल ११ टक्केवारीत वाढ करण्यात आली आहे. डिजिटल भारतात निवडणुक आयोगाकडुन ही चूक झाली की, मतदानाच्या टक्केवारीत वाढ करुन सरकारच्या दबावाखाली निवडणुक आयोग काही घोळ तर करत नाही ना ? डिजिटल युगात मतदानाचा टक्का वाढलाच कसा ? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उपस्थित केला आहे.
यापूर्वी, निवडणुक आयोगाकडून मतदानाच्या दिवशीच रात्री उशिरापर्यत एकुण टक्केवारी किती झाली, याची माहिती प्रसिद्ध होत होती. यात प्रामुख्याने किती मतदार होते आणि किती मतदारांनी मतदान केले यासह टक्केवारी जाहीर करीत होते. लोकसभेच्या महाराष्ट्रात झालेल्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात मिळुन १३ मतदारसंघामध्ये मतदान झाले आहे. त्यावेळी सायंकाळी ७ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार सरासरी ५९.५६ टक्के मतदान झाल्याचे निवडणुक आयोगानेच आपल्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर केले होते. परंतु, आता यात वाढ करुन या १३ ही मतदार संघातील अंतिम आकडेवारी ही ६२.७१ टक्के जाहीर करण्यात आली. यामध्ये साधारणता ३.०८ टक्के वाढ दाखविण्यात आली.
नागपूर वगळता सर्वच ठिकाणी टक्केवारीत वाढ दाखविण्यात आली आहे. चंद्रपुर येथे तर सुरुवातीला ६०.३५ असलेली टक्केवारी ही ७.२० टक्याने वाढवून ती ६७.५५ दाखविण्यात आली आहे. असाच प्रकार महारष्ट्रात पहिल्या व दुसऱ्या टप्यात झालेल्या १३ ही मतदार संघात दिसत आहे. एवढया मोठया प्रमाणात वाढलेल्या या टक्केवारीमुळे निवडणुक आयोगाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. निवडणुक आयोगावर केंद्र सरकारचा दबाव असल्याची अनेक उदाहरणे समोर आली असताना, आता हा मतदान टक्केवारीचा घोळ समोर आला आहे. निवडणुक आयोगाने जाणीवपूर्वक भाजपचे उमेदवार विजयी करण्यासाठी तर हा घोळ तर केला नाही ना ? असा प्रश्न अनिल देशमुख यांनी उपस्थित केला आहे.
हेही वाचा