धुळे : पुढारी वृत्तसेवा
साक्री तालुक्यातील वासखेडी येथे केवळ शॉप ॲक्ट लायसन काढून स्पार्कींग मेणबत्ती तयार करण्याचा कारखाना टाकण्यात आला होता. आता वेगवेगळ्या पाच विभागांना पत्र लिहून या कारखान्यासंबंधीचा सुस्पष्ट अहवाल मागवण्यात येणार आहे. यानंतर कारखान्याचे मालक आणि संबंधित असणाऱ्या व्यक्तींवर आणखी कठोर कारवाई करणे शक्य होणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी दिली आहे.
साक्री तालुक्यातील वासखेडी येथे स्पार्कींग मेणबत्ती तयार करण्याच्या कारखान्यात झालेल्या स्फोटानंतर आता पोलिसांनी सखोल तपास करणे सुरू केले आहे. हा कारखाना सुमारे पाच वर्षांपूर्वी गावात सुरू होता. पण काही लोकांनी स्फोटके वापरली जात असल्याने हरकती घेतल्या. त्यामुळे कारखाना हा गावाबाहेरील शेतात एका पत्रटी गोदामामध्ये सुरू करण्यात आला. प्राथमिक तपासामध्ये हा कारखाना सुरू करण्यासाठी केवळ शॉप ॲक्ट लायसन काढले गेल्याची बाब निदर्शनास आल्याचे पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी सांगितले. त्यामुळे आता अग्निशमन दल, वीज वितरण कंपनी, स्फोटक कमिटी, फॅक्टरी इन्स्पेक्टर तसेच लेबर विभागाकडून या कारखान्या संदर्भात चौकशी करून सुस्पष्ट अहवाल मागवण्यात येणार आहे. यासाठी या पाचही विभागांना पत्र लिहिण्यात येणार आहे. या विभागाकडून आलेल्या अहवालानंतर संबंधित मालक आणि इतरांवर कठोर कारवाई करणे शक्य होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
एका आरोपीने नाव बदलले
विशेषत: या गुन्ह्यांमधील तिघा आरोपींना पोलीस कोठडी मिळाली आहे. या पोलीस कोठडीत चौकशी केली असता यातील एका आरोपीचे मूळ नाव रवींद्र राकेश कुमार सिंह असून तो उत्तर प्रदेशातील राहणारा आहे .मात्र या आरोपीने स्वतःचे नाव अरविंद जाधव असे बदलल्याचे देखील निदर्शनास आले आहे. त्यामुळे त्याने आपली वैयक्तिक माहिती का बदलली, ही बाब देखील तपासून पाहिली जात असल्याचे बारकुंड यांनी स्पष्ट केले आहे.