वडगावातील नळ पाणीपुरवठ्याचे होणार ऑडिट | पुढारी

वडगावातील नळ पाणीपुरवठ्याचे होणार ऑडिट

वडगाव मावळ : वडगाव शहरातील पाणीपुरवठा सुरळीत होण्याच्या दृष्टीने पाणीपुरवठ्याचे वॉटर ऑडिट करण्याचा निर्णय पाणीपुरवठा समितीच्या बैठकीत घेण्यात आला, अशी माहिती उपनगराध्यक्ष सायली म्हाळसकर यांनी दिली. उपनगराध्यक्षा तथा पाणीपुरवठा समितीच्या सभापती सायली म्हाळसकर यांच्या अध्यक्षतेखाली व नगराध्यक्ष मयूर ढोरे, मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम, नगरसेवक राजेंद्र कुडे, दिनेश ढोरे, किरण म्हाळसकर, पूजा वहिले, दिलीप म्हाळसकर, अर्चना म्हाळसकर, रवींद्र म्हाळसकर, मंगेश खैरे तसेच पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली होती

पाणी सोडण्याच्या वेळेवर चर्चा
या वेळी नगरसेवकांकडून शहरातील पाणीविषयक समस्या व प्रश्न जाणून घेऊन महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यात आले. शहरातील सर्व प्रभागात ठरवलेल्या वेळेप्रमाणे पाणीपुरवठा होतो का व किती वेळ यांची माहिती घेण्यात आली, नळकनेक्शनसाठी नगरपंचायतकडे प्राप्त झालेल्या सर्व अर्जधारकांना त्वरित नळ जोडणी करून देण्यात येणार आहेत. मात्र, पाणीपुरवठा विभागाची परवानगी असल्याशिवाय कोणत्याही नागरिकांना नियमबाह्य नळ जोडणी करून दिले जाणार नाही.

थकीत मालमत्ताधारकांचे नळकनेक्शन तोडणार
प्रभागातील कोणतीही पाणीपुरवठ्याची कामे करण्यासाठी नगरसेवकांना संबंधित खात्यातील सभापती, अधिकारी यांना लेखी स्वरूपात कळवावे लागणार आहे. तसेच, पाहणी दौरा झाल्यानंतर त्या कामास परवानगी दिली जाणार आहे. ज्या मालमत्ताधारकांचा कर थकीत आहे अशा धारकांचे नळकनेक्शन तोडण्याची कारवाई सुरू करण्यात येणार आहे. सर्व प्रभागांमध्ये पाणीपुरवठा विभाग पथकाकडून वॉटर ऑडिट केले जाणार आहे.

झाडांसाठी टँकरने पाणीपुरवठा
पाणीपुरवठाबाबत समस्या व तक्रारीसाठी विभागाच्या अधिकृत ग्रुपची स्थापना करण्यात येणार आहे व पाण्याविषयी सविस्तर माहिती दिली जाणार आहे. शहरातील सर्व झाडे व वृक्षांचे संवर्धन व्हावे, यासाठी विभागाकडून पाण्याच्या टँकरची व्यवस्था करण्यात येणार आहे. उन्हाळ्यात पाण्याचा वापर जपून करावा व पाण्याचा अपव्यय टाळावा, याबाबत सर्व नगरसेवकांनी आपल्या प्रभागांमध्ये जनजागृती करावी, तसेच पाण्याचा अपव्यय करणार्‍या नागरिकांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. पाणीपुरवठ्याबाबतची दोन लाख रुपयांपर्यंतच्या खर्चाची कामे नगरसेवकांकडून पाणीपुरवठा विभागाकडे मागविण्यात आली.

Back to top button