बीआरटी मार्गाच्या उद्घाटनाला मुहूर्त मिळेना; दिघी-आळंदी रोडवरील प्रवास झाला त्रासदायक | पुढारी

बीआरटी मार्गाच्या उद्घाटनाला मुहूर्त मिळेना; दिघी-आळंदी रोडवरील प्रवास झाला त्रासदायक

भोसरी : नागरिकांचा प्रवास सुखकर होण्यासाठी आळंदी ते दिघी बीआरटी मार्ग तयार करण्यात आला आहे. परंतु, कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेल्या बीआरटी मार्गांवर अद्याप एकही बस धावली नाही. बीआरटी मार्गाचे काम पूर्ण होऊन वर्ष होत आले, तरी हा मार्ग अद्याप उदघाट्नाच्या प्रतीक्षेत आहे. या मार्गाचे उद्घाटन कधी होणार? असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.

अद्याप एकही बस धावली नाही
महापालिकेच्या हद्दीत येणार्‍या या पालखीमार्गाचे काम महापालिकेने चार टप्प्यात करीत रुंदीकरण केले आहे. साठ मीटरचा विस्तीर्ण रस्ते करून या मार्गावर पादचारी मार्ग, सायकल ट्रॅक, सेवारस्ता, बीआरटीएस मार्ग, वृक्षारोपण करण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा व दुभाजकांमध्ये सोय करण्यात आली आहे. नॉन बीआरटी बसच्या वाहतुकीसाठी हा मार्ग खुला करण्यात आला आहे. मात्र, या रस्त्याच्या मधोमध केलेला बीआरटीएस मार्गावर एकही बस अद्याप धावली नाही.

कोरोना परिस्थितीमुळे प्रशासनाने नियोजन फसले
या बीआरटीएस मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. या मार्गाची लांबी 6 किमी असून चर्‍होली ते दिघीतील मॅगझीन चौक या 60 मीटर रुंदी असलेल्या मार्गावर एकूण 9 बसथांबे असणार आहेत. तर, दत्तनगरपासून जकात नाक्यापर्यंत या मार्गाची रुंदी 30 मीटर झाली आहे. या रस्त्यावर 6 बसथांबे प्रस्तावित असून, तीन येण्याकरिता व तीन जाण्याकरिता असणार आहेत.

प्रत्यक्ष काम सुरू झाल्यानंतर वर्षभरात बीआरटीएस मार्गावर बस धावण्याचे नियोजन केले होते. मात्र, नंतर उद्भवलेली कोरोनाची परिस्थिती यामुळे प्रशासनाने केलेले नियोजन फसले. आता कोरोनाची परिस्थिती निवळली असली तरी या मार्गावर बीआरटी बसची गरज भासणार आहे. बीआरटी प्रशासनाकडून याबाबत नियोजन सुरू असून, बस उपलब्ध झाल्यावर उद्घाटनाचा मुहूर्त ठरणार असल्याची
माहिती आहे.

दिवसभरात 1600 फेर्‍या
प्रवाशांचा प्रवास गतिमान व्हावा, याकरिता पीएमपी प्रशासनाने महत्त्वाच्या मार्गावर बीआरटी सुरू केले आहे. मात्र, बीआरटीचा सुरू होण्याचा प्रवास मंद झाला आहे. मागील एक वर्षापासून बीआरटी सुरू झाली नाही. या मार्गाजवळील रस्त्यावरून दिवसभरात 144 बसच्या माध्यमातून 1600 फेर्‍या होतात. मात्र, हा मार्ग गेल्या वर्षापासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे.

दिघी-आळंदी बीआरटी मार्गावर बीआरटी बस चालवून चाचणी घेण्यात आली आहे. प्रशासनाकडून आदेश आल्यावर लवकरच उदघाट्न करण्यात येईल.

                            – विजयकुमार मेदगे, आगारप्रमुख, भोसरी

Back to top button