धुळे : अग्नी तांडवातील मृत्यूंची संख्या पाचवर; तिघांना बेड्या

धुळे : मेणबत्ती तयार करण्याच्या कारखान्यात स्फोटाच्या आवाजाने वासखेडी शिवारात नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. (छाया: यशवंत हरणे)
धुळे : मेणबत्ती तयार करण्याच्या कारखान्यात स्फोटाच्या आवाजाने वासखेडी शिवारात नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. (छाया: यशवंत हरणे)
Published on
Updated on

धुळे : पुढारी वृत्तसेवा

साक्री तालुक्यातील वासखेडी शिवारात शोभेच्या मेणबत्तीच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात आणखी एका महिलेचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांची संख्या पाचवर पोहोचली आहे. विशेषता या कारखान्यात स्फोटके बाळगली जात असताना सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना केलेल्या नसल्याची प्राथमिक बाब तपासात उघड झाली आहे. तर या संदर्भातील परवानग्या देखील तपासल्या जात आहेत. दरम्यान या प्रकरणात चार जणांविरोधात सदोष मनुष्य वधाचे गुन्हे दाखल केले असून तिघांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

साक्री तालुक्यातील वासखेडी शिवारात मंगळवारी (दि.18) दुपारी अडीचच्या सुमारास मेणबत्ती तयार करण्याच्या कारखान्यात भीषण स्फोट झाल्याने आग लागली. या आगीत होरपळल्याने जैताने येथे राहणाऱ्या मायाबाई भागवत (35) आणि पूनम भागवत (15) या मायलेकीसह नयना माळी (45) आणि सिंधुबाई राजपूत (56) यांचा जागीच होरपळून मृत्यू झाला. तर रुग्णालयात उपचार घेत असताना संगीता चव्हाण यांचा देखील मृत्यू झाला आहे. गंभीर जखमी अवस्थेत निकिता सोनवणे या अजूनही दवाखान्यात उपचार घेत आहेत. या प्रकरणात निजामपूर पोलीस ठाण्यात भैय्या भागवत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रोहिणी जगन्नाथ कुवर (रा. वासखेडी) तसेच तुळजापूर तालुक्यातील सुरेश शापू माने यांच्यासह वर्कशॉपचे सुपरवायझर जगन्नाथ रघुनाथ कुवर आणि ऑपरेटर अरविंद जाधव या चौघांच्या विरोधात व बालकामगार प्रतिबंधक आणि विनीयमन कलम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मदत करणे दूर तर सुपरवायझर आणि ऑपरेटर पळाले
या प्रकरणाचा प्राथमिक तपास करीत असताना अनेक धक्कादायक बाबी पुढे आल्या आहेत. कारखान्यामध्ये स्पार्कींग मेणबत्ती तयार करण्यासाठी स्फोटकांची दारू वापरली जात असताना अग्नी प्रतिबंध करण्याची कोणतीही उपाययोजना केली जात नसल्याची बाब उघडकीस आली आहे. विशेषतः मजुरांच्या सुरक्षिततेसाठी कोणतीही उपाययोजना केलेली नव्हती. आग लागल्यानंतर घटनास्थळावरून वर्कशॉपचे सुपरवायझर आणि ऑपरेटर यांनी आगीतून मजुरांना बाहेर काढण्याऐवजी पलायन केल्याची बाब देखील पुढे आली आहे. शासनाने कोणत्याही बालकाकडून धोकेदायक काम करून घेण्यास प्रतिबंध केलेला असताना या कारखान्यांमध्ये पुनम भागवत (15) या दहावीच्या अल्पवयीन विद्यार्थिनीला बालकामगार म्हणून कामास ठेवले गेले असल्याची बाब देखील उघडकीस आली आहे.

दहावीची विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
विशेषतः पूनम भागवत (15) या मुलीने नुकतीच दहावीची परीक्षा दिली. मात्र घराला हातभार लागावा यासाठी तिने मजुरीसाठी या कारखान्यात काम करण्याचा निर्णय घेतला. मात्र दुर्दैवाने तिलाही जीव गमावण्याची वेळ आली.

जैताणे गाव कडकडीत बंद
या स्फोटामध्ये जैताने गावातील तीन महिलांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे गावात शोककळा पसरली आहे. बुधवार (दि.19) जैताने गावातील सर्व व्यवहार बंद करण्यात ठेवण्यात आले होते. तर गावात अजूनही स्मशान शांतता पसरल्याचे चित्र आहे.

मूळ मालकाच्या अटकेसाठी पथक रवाना
विशेषत: कारखान्याचा मूळ मालकाला अटक करण्यासाठी तुळजापूर येथे पथक रवाना करण्यात आले आहे. यानंतरच कारखान्याच्या मंजुरीसाठी कोणते परवाने घेण्यात आले, याची बाब स्पष्ट होणार आहे. दरम्यान तपास पथकाने आता ग्रामपंचायतीकडून दिल्या गेलेल्या परवानग्या तपासण्याचे काम सुरू केले आहे.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news