‘पीएमआरडीए’वर देवेंद्र फडणवीस यांचेच वर्चस्व राहणार!

‘पीएमआरडीए’वर देवेंद्र फडणवीस यांचेच वर्चस्व राहणार!

पुणे, सुषमा नेहरकर-शिंदे : सध्या राज्यात सर्वाधिक वेगाने नागरीकरण व विकास सुरू असलेल्या पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) अध्यक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच आहेत. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या पुणे व पश्चिम महाराष्ट्रात भाजपची पाळेमुळे अधिक भक्कम करण्यासाठी 'पीएमआरडीए'ची सर्व सूत्रे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्याच हातात ठेवणार असल्याची चर्चा आहे.

महाआघाडी सरकारमध्ये देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अध्यक्ष असताना 'पीएमआरडीए'ची सर्व सूत्रे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याच हातात होती. सध्या राज्यात सर्वाधिक वेगाने नागरीकरण होणारा भाग म्हणून 'पीएमआरडीए' क्षेत्राकडे पाहिले जाते. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका वगळता या दोन्ही शहरांलगतच्या तालुक्यांतील तब्बल 817 गावांचा समावेश 'पीएमआरडीए' हद्दीत करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातील 13 तालुक्यांपैकी खेड, शिरूर, हवेली, मावळ, मुळशी, पुरंदर, भोर, वेल्हा आणि दौंड या 9 तालुक्यांमध्ये 'पीएमआरडीए' क्षेत्र विस्तारले आहे. सध्या पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या बरोबरीने विकास सुरू आहे.

'पीएमआरडीए' हद्दीत असलेल्या औद्योगिक क्षेत्र, नवीन मेट्रो प्रकल्प, रिंगरोड, पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेमार्ग यामुळे भविष्यात पुणे, पिंपरी-चिंचवड शहरांपेक्षा 'पीएमआरडीए' हद्दीत सर्वाधिक नागरीकरण व विकासाचे मार्ग खुले असतील. यामुळेच पुणे जिल्ह्यात वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी 'पीएमआरडीए'ची सूत्रे हातात असणे फडणवीस यांच्यासाठी आवश्यक आहे.

'पीएमआरडीए'चे अध्यक्ष कोणीही असो, वर्चस्व फडणवीसांचे

राज्याचे मुख्यमंत्री 'पीएमआरडीए'चे पदसिद्ध अध्यक्ष आहेत. सेना-भाजप युती सरकारमध्ये सुरुवातीच्या काळात प्राधिकरणाचे अध्यक्षपद पालकमंत्र्यांकडे होते. पण, नंतर ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:कडे घेतले. फडणवीस यांनी 'पीएमआरडीए'ची सूत्रे आपल्या हाती घेतल्यानंतर अनेक विकासकामांना खऱ्या अर्थाने गती दिली. फडणवीस यांच्या पुढाकारामुळेच 'पीएमआरडीए'चा विकास आराखडा तयार करण्यास सुरुवात झाली.

दरम्यान, महाविकास आघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच 'पीएमआरडीए'चे अध्यक्ष होते. ठाकरे अध्यक्ष असले तरी 'पीएमआरडीए'वर अजित पवार यांचेच वर्चस्व होते. यामुळेच राज्यात सत्ताबदल होताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपले अत्यंत विश्वासू अधिकारी सुहास दिवसे यांची 'पीएमआरडीए' आयुक्त म्हणून नियुक्ती केली. दिवसे यांनी देखील कोरोना संकट असताना विकास आराखड्याचे काम हाती घेतले. सध्या आराखडा तयार होऊन त्यावर आलेल्या हरकती व सूचनांवर सुनावणी सुरू आहे. परंतु, आता पुन्हा एकदा राज्यात सत्तांतर होऊन शिंदे- फडणवीस सरकार स्थापन झाले आहे. सरकारबदल होताच सर्वांत प्रथम 'पीएमआरडीए' आयुक्त सुहास दिवसे यांची बदली करीत फडणवीस यांनी आपल्या विश्वासातील व्यक्तीची नियुक्ती केली. यामुळेच 'पीएमआरडीए'चे अध्यक्ष एकनाथ शिंदे असले, तरी सर्व सूत्रे फडणवीस यांच्याच हातात असणार आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news